वडगाव मावळ (किशोर ढोरे) – घरगुती वापराच्या सिलिंडरमधून गॅस काढून तो व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरताना 27 फेब्रुवारी 2023 रोजी स्फोट झाला. या स्फोटात जखमी झालेल्या चौघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनास्थळावरून पोलिसांनी 44 सिलिंडर जप्त केले. मात्र अद्याप हे सिलिंडर कोणत्या एजन्सीचे होते याचा शोध अद्यापही पोलीस यंत्रणेला लागलेला नाही. यामुळे वडगाव मावळ पोलिसांच्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पिंपरी चिचंवड शहरात सुरू असलेल्या गॅस चोरीचे लोण अगदी खेडेगावातही पसरले आहे. वडगावमधील ढोरे चाळीमध्ये राहणाऱ्या एका खोलीत 27 फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास गॅसचा स्फोट झाला. या घटनेतील चार जणांना उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल केले. या जखमीपैंकी एकाचा 3 मार्चला तर इतर तिघांचा 5 ते 6 मार्च दरम्यान उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी व्यावसायिक आणि घरघुती वापरायचे असे एकूण 44 सिलेंडर जप्त केले आहेत. या घटनेत आगीत होरपळून मृत्यू झालेले चौघेजण शहरात गॅस सिलिंडर वितरणाचे काम करीत असल्याने ते अनेकांच्या परिचित होते. मात्र पोलिसांना अद्यापी हे चौघेजण कोणत्या गॅस एजन्सीमध्ये काम करत होते, यांची माहिती मिळालेली नाही. विशेष म्हणजे घटना स्थळी असलेले सर्व सिलेंडर व एक टेम्पो पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे. मात्र तरी देखील पोलिसांना गॅस एजन्सी मालकाचा शोध लागत नसल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेत मयत झालेले चौघेजण कोणत्यातरी गॅस एजन्सीसाठी काम करत होते. त्या एजन्सी मालकाच्या संगणमतानेच गॅस सिलेंडर बेकायदेशीररित्या गॅस चोरी करून विकण्याच्या उद्देशाने त्याठिकाणी साठवून ठेवलेले असावेत, असा संशय देखील वर्तविण्यात येत आहे. गॅस एजन्सी मालकाने देखील गॅस सिलेंडरचा एवढा मोठा साठा असुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी कशासाठी दिला असावा. तसेच या ठिकाणी विक्रीसाठी आणलेल्या घरगुती वापराच्या सिलेंडरमधून गॅस काढून ते व्यावसायिक सिलेंडर भरले जात होते आणि ही संबंधित गॅस एजन्सी मालकाच्या संगणमताने सुरू होती का? या घटनेत एजन्सी मालक देखील दोषी आढळून येण्याची शक्यता असल्याने किंवा इतर काही कारणास्तव पोलीस गॅस एजन्सी मालकास अभय तर देत नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आपल्या परिसरात कुठे काय सुरू आहे याची खडान्खडा माहिती पोलिसांना असते. त्यामुळे भर वस्तीत होणाऱ्या गॅस चोरीची कल्पना पोलिसांना कशी काय नसावी, याबाबत आश्चर्य वाटते. जर पोलिसांना याबाबत माहिती असूनही त्यांनी याकडे का दुर्लक्ष केले, असा प्रश्न निर्माण होत आहे.
…तर आसपासचा परिसरही बेचिराख झाला असता
घरगुती सिलिंडरमधून गॅस काढून तो व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरण्यात येत होता. त्यावेळी गॅसचा स्फोट होऊन चौघेजण जखमी झाले. घटनास्थळावरून तब्बल 44 गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. यापैकी बहूतांश गॅस सिलिंडर भरलेले होते. त्यांचाही जर स्फोट झाला असता तर आसपासचा काही परिसरही बेचिराख झाला असता.