चिखली – कुदळवाडी येथे गुरुवारी (दि. 16) रात्री पाऊस पडताच पदपदिव्यांसाठी टाकलेली भूमिगत केबल ना दुरुस्त होऊन मोठ्या प्रमाणावर स्पार्किंग होऊन विजेचे गोळे जमिनीतून बाहेर पडत होते. त्यामुळे रस्त्याने ये जा करणारे नागरिक, वाहनचालक भयभीत झाले. महावितरणच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देताच विद्युत पुरवठा खंडित करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
पिंपरी चिंचवड महापालिकेने पदपथावरून रात्री नागरिकांना व्यवस्थित चालता यावे यासाठी पथदिवे बसविले आहेत. या पथदिव्यांना विद्युतपुरवठा करण्यासाठी भूमिगत केबल टाकली आहे. मागील काही महिन्यांपूर्वी कुदळवाडी येथील पथदिव्यांच्या भूमिगत केबल बदलेल्या आहेत. परंतु उन्हाळा सुरू होताच अवकाळी पाऊस आल्याने गुरुवारी रात्री मोरे पाटील चौक ते जाधववाडीकडे जाणाऱ्या मार्गावर आयुष मेडिकलच्या समोर केबल ना दुरुस्त होऊन जमिनीतून आगीचे गोळे बाहेर पडू लागल्याने रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यातही काही नागरिक रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभा राहून ये-जा करणाऱ्या नागरिकांना येथून प्रवास करू नका विद्युत केबल ना दुरुस्त झाल्याने करंट लागण्याचा धोका आहे अशा सूचना देत होते.
नागरिकांच्या सतर्कतेमुळे कोणतीही अपत्ती उद्भवली नाही. तसेच महावितरणचे कर्मचारी माहिती मिळाताच घटनास्थळी दाखल होऊन त्वरित विद्युतपुरवठा खंडित केल्याने या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. परंतु रात्रीपासून पथदिवे बंद आहेत. तरी महापालिकेच्या संबंधित विभागाने येथील केबल दुरुस्त करून पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.
अनधिकृत रस्ता खोदाईचा परिणाम
कुदळवाडी आणि शहरातील इतर भागात बहुतांश नागरिक केबल, पाइपलाइन टाकण्यासाठी महापालिकेकडून रितसर परवानगी न घेता अनधिकृतपणे रस्ता खोदाई करत आहेत. खोदलेला रस्ता काम झाल्यानंतर पूर्ववत केला जात नाही. केवळ मुरूम टाकून बुजविण्यात येत आहे. त्यामुळे वाहने जाऊन तेथे चर निर्माण होत असून दुचाकींना अपघात घडत आहे. भूमिगत केबल, पाइपलाइन फुटण्याच्या घटना घडत आहेत. कुदळवाडी येथे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत रस्ते खोदाई केलेली आहे. याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने अशा घटना घडत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या स्थापत्य विभागाने अनधिकृतपणे रस्ते खोदाई केलेल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.