हुकूमशहा किम जोंगने काढलेल्या विचित्र आदेशाचा परिणाम
प्यानगँग : उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग ऊन याचे विचित्र आदेश नेहमीच चर्चेत असतात. गेली अनेक वर्षे उत्तर कोरियात सत्तेवर असलेल्या किम जोंगच्या एका नव्या आदेशामुळे आता देशातील अनेक महिलांना आपले नाव बदलावे लागत आहे. या आदेशानुसार उत्तर कोरियातील कोणत्याही महिलेला जु आय हे नाव वापरता येणार नाही.
जु आय हे किम जोंगच्या मुलीचे नाव असून हे नाव तिच्याशिवाय कोणालाही वापरता येणार नाही, असा निर्णय कीमने घेतला असल्यामुळे हे नाव असणाऱ्या उत्तर कोरियातील हजारो महिलांना आता आपले नाव बदलावे लागत आहे. अशाच प्रकारचा आदेश किम जोंगने काही वर्षांपूर्वी स्वतःच्या नावाबाबतही काढला होता. त्यामुळे उत्तर कोरियामध्ये कोणत्याही पुरुषाला किम जोंग ऊन हे नाव वापरता येत नाही. किमची मुलगी जु आय फक्त दहा वर्षाची असून किम जोगनंतर तीच देशाचा कारभार बघणार हे निश्चित झाले आहे.
त्यामुळे तिचे महत्त्व वाढवण्यासाठीच हा नावाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही किम जोगने असेच विचित्र आदेश प्रसारित केले होते जे अजूनही अमलात आहेत. गेल्या वर्षी कीमच्या वडिलांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली होती. तेव्हा उत्तर कोरियातील नागरिकांनी 10 दिवस हसायचे नाही किंवा कोणताही मनोरंजन कार्यक्रम बघायचा नाही अशा प्रकारचा आदेश किम जोगने काढला होता.
त्याशिवाय नागरिकांना निळ्या रंगाची जीन्स परिधान करता येत नाही तसेच कोणालाही लेदर जॅकेटचा वापर करता येत नाही. कारण लेदर जॅकेट फक्त किम एकटाच वापरू शकतो उत्तर कोरियातील स्त्रिया किंवा पुरुष यांना केसाचा रंग बदलण्यासही मनाई करण्यात आली आहे. म्हणजेच उत्तर कोरियात केसांना रंग लावण्यासही बंदी आहे. किमची हुकूमशाही राजवट अतिशय खतरनाक असल्यामुळेच त्याच्या अशा विचित्र आदेशांना कोणताही विरोध होत नाही आणि सर्वजण निमूटपणे अशा आदेशांचे पालन करीत असतात.