पुणे -महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात गतीमानता आणण्यासाठी आता राज्यशासनाकडून मंत्रालयात वापरण्यात येणाऱ्या ई-ऑफिस (ई-फाईल) प्रणालीचा वापर महापालिकेच्या कामकाजात केला जाणार आहे. प्रथम प्रायोगिक तत्वावर पालिकेच्या 12 विभागांमध्ये या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे, फाईलची सर्व कागदपत्रे संगणकावरच राहणार असून, संबधित प्रकरणाची कोणतीही कागदोपत्री फाईल असणार नाही त्यामुळे, पालिकेतील फाईलींचा टेबल फिरण्याचा प्रवास या यंत्रणेमुळे बंद होणार आहे. मंत्रालयानंतर अशा प्रकारची यंत्रणा वापरणारी पुणे ही राज्यातील पहिली महापालिका ठरणार आहे.
गैरप्रकार थांबणार
सध्या महापालिकेत एखाद्या विषयाची फाईल तयार झाल्यानंतर त्यासाठी आवश्यक असलेल्या मान्यता तसेच कागदपत्रांची पूर्तता फाईलद्वारे केली जाते. या फाईल एका विभागातून दुसऱ्या विभागात हातोहात फिरविल्या जातात, यापूर्वी त्यावर केवळ आवक-जावक क्रमांक असायचे तर अनेकदा त्यात खाडोखोड करून फाईल गायब करणे अथवा गहाळ करण्याचे प्रकारही होत होते. त्यानंतर आता प्रत्येक फाईल संबधित विभागात गेल्यानंतर त्याला संगणकीकृत आवक जावक क्रमांक दिला जातो. परिणामी, कोणती फाईल कोणत्या विभागात आहे निदर्शनास येते. मात्र, आता या पुढे संबधित फाईल पूर्णत: संगणकावर असणार आहे. तसेच ती एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे संगणकावरच पाठविली जाणार असून अधिकाऱ्यांवर त्यावर काही शेरा असल्यास तो ऑनलाईनच नमूद करावा लागेल. तसेच त्यावर ई-सही असेल.
कागदपत्रांची संख्या घटणार
मंत्रालयात काही वर्षापूर्वी लागलेल्या आगीत अनेक महत्वाच्या फाईल्स जळाल्या होत्या. त्यामुळे हा संभाव्य धोका टाळण्यासाठी जास्तीत जास्त ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे फाईल आता संगणकावरच तयार होणार असल्याने त्यासाठी कागद वापरावे लागणार नाहीत. तसेच महापालिकेत या फाईलचे काम झाल्यानंतर त्या ठेवण्यासाठी रेकॉर्ड रूमची आवश्यकता भासणार नाही.
या विभागात होणार अंमलबजावणी
महापालिका आयुक्त कार्यालय
महापालिका अतिरिक्त आयुक्त कार्यालय (ज)
मुख्य लेखा व वित्त विभाग
माहिती व तंत्रज्ञान विभाग
भवन रचना विभाग
पथ विभाग
पाणी पुरवठा विभाग
भू संपादन व व्यवस्थापन विभाग
दक्षता विभाग
घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय
घोले रस्ता – शिवाजीनगर परिमंडळ
विद्युत विभाग