– नीलकंठ मोहिते
इंदापूर -पुणे जिल्ह्यात बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विचाराचा अखंड राहिला असून, या लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी अनोखा चमत्कार करण्याच्या तयारीत आहे. राज्याचे माजी सहकार मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना थेट दिल्लीतून राजकीय ताकद पुरवली जात असल्याने, बारामती लोकसभेची गणिते भारतीय जनता पार्टी यशस्वी करेल असा आशावाद पक्षातून व्यक्त होत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी पुणे जिल्ह्यात नव्हे; तर राज्यात राजकीय पंगा कोणत्याही राजकीय पक्षातील नेता घेत नाही. हे सर्वश्रुत असले तरीदेखील, भारतीय जनता पार्टीमध्ये मागील काही वर्षांपूर्वी प्रवेश केलेले भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात पक्षाचा राजकीय अजेंडा दर्जेदार करण्यासाठी, आपणाकडे असलेल्या राजकीय अनुभवाचा पुरेपूर फायदा घेत, नवे जुने सवंगडी एकत्र करत, पक्षवाढीची भूमिका राबवली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अत्यंत चांगले राजकीय संबंध आहेत. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी बारामती मिशन या अंतर्गत बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये दौरा केला. त्याचबरोबर केंद्राचे आणखी एक मंत्री व भारतीय जनता पार्टीने जबाबदारी सोपवलेल्या, भारतीय जनता पार्टीच्या टीम सोबत हर्षवर्धन पाटील सातत्याने अग्रभागी दिसत आहेत. एकूणच हर्षवर्धन पाटील यांना दिल्ली येथूनच, राजकीय ताकद पुरवली जात असल्याचे स्पष्ट होत आहे.