खडकवासला (पुणे) – व्हॉट्सॲप ग्रुपवरील चॅटिंगवरून झालेल्या बाचाबाचीत एका बांधकाम व्यावसायिकाने एकावर भरदिवसा गोळीबार केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. विशेष म्हणजे गोळीबार झालेल्या ठिकाणापासून सिंहगड पोलीस ठाणे हे हाकेच्या अंतरावर आहे.
या गोळीबार मध्ये रमेश राठोड (रा. वारजे, पुणे) हे जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी संतोष पवार (रा. बावधन, पुणे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, यातील देवा राठोड यांनी त्यांच्या समाजाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर संतोष पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिहिले होते. यांच्यावरून संतोष पवार व देवा राठोड यांच्यात बाचाबाची झाली. हा वाद मिटवण्यासाठी संतोष पवार, देवा राठोड व रमेश राठोड यांच्यासह अन्य काहीजण सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी भागातील योगीराज ऑटो सेंटरमध्ये चर्चा करण्यासाठी आले होते.
मात्र या ठिकाणी दोघांचे वाद उफाळून आले. म्हणून या भांडणात रमेश राठोड हे मध्ये पडल्याने संतोष पवार यांनी कमरेला असणारी पिस्तूल काढून रमेश राठोड यांच्या दिशेने गोळीबार केला. यात रमेश राठोड यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता विभागाचे सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर व कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.