नवी दिल्ली : 2002 च्या गुजरात दंगलीवरील बीबीसीच्या माहितीपटावर सरकारने बंदी घातली आहे. सरकारच्या या कारवाईवर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी सरकारने पंतप्रधानांवरील डॉक्युमेंटरीवर बंदीची कारवाई केली मात्र येत्या प्रजासत्ताक दिनी प्रदर्शित होणाऱ्या ‘गांधी गोडसे: एक युद्ध’ या चित्रपटावर बंदी घातली नसल्याचे सांगितले. तसेच ही सरकारची दुटप्पी भूमिका असल्याचे सांगत मोदी सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी ‘गांधी गोडसे: एक युद्ध’ या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही केली.
बीबीसीने नुकतीच गुजरात दंगलीवर ‘इंडिया: द मोदी प्रश्न’ ही दोन भागांची डॉक्युमेंटरी प्रसिद्ध केली आहे. त्याचा फक्त पहिला भाग रिलीज झाला आहे. मात्र केंद्र सरकारने या डॉक्युमेंटरीमंडे पंतप्रधानांची बदनामी करण्यात येत असल्याचे सांगत यावर बंदी घातली आहे. याच मुद्द्यावर बोलताना ओवेसी म्हणाले, ” सध्या गुजरात दंगलीच्या वेळी घडलेल्या प्रसंगावर आधारित एक डॉक्युमेंटरी बीबीसीने तयार केली आहे. मात्र सरकारने यावर बंदीची कारवाई केली आहे.या दंगलीच्या वेळी पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते.
दरम्यान, यावेळी ओवेसींनी गुजरात दंगलीच्यावेळी बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरण आणि काँगेसचे खासदार एहसान जाफरी याच्या हत्येचा मुद्दा देखील यावेळी उपस्थित केला.
पुढे बोलताना ओवैसी यांनी, ” महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेवर चित्रपट बनवला जात आहे…भारताचे पंतप्रधान या चित्रपटावर बंदी घालणार का?” मी ते स्वतः पाहिले आहे… गांधींना त्यांनी का मारले हे चित्रपटात स्पष्ट केले आहे. त्यामुळे बीबीसीने पीएम मोदींबद्दल काही दाखवले तर त्यावर बंदी येते मात्र महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या व्यक्तीवर चित्रपट येतो, हे दुटप्पी वागणे आहे. असेही ओवैसी यावेळी म्हणाले.