वाठार स्टेशन – सातारा-लोणंद महामार्गावर देऊर येथील रेल्वे गेटजवळ आयशर टेम्पो झाडाला धडकून झालेल्या अपघातात टेम्पोवरील चालक साजिक जियाकात खान (वय 58 रा. औरंगाबाद) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार साजिक खान हे औरंगाबादहून आयशर टेम्पो (क्रमांक एम. एच. 20 जी. सी. 1038) हा मालट्रक घेऊन सातारच्या दिशेने जात असताना देऊर नजीक रेल्वे गेटजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या बाभळीच्या झाडाला आयशर टेम्पो धडकला.
यात चालक खान यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती कळताच वाठार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचा पंचनामा करुन मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी पिंपोडे बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. अपघाताचे कारण स्पष्ट झाले नसून पुढील तपास वाठार पोलीस करत आहेत.