“गूगल’ हे जगातील सर्वांत मोठे सर्च इंजिन. अगदी मोफत. हे इंजिन आपल्याला हव्या त्या प्रश्नांची उत्तरं देतं. चित्रपट, गाणी, फोटो पाहण्या-ऐकण्याची, डाऊनलोड करण्याची इतकंच नव्हे तर साठवून ठेवण्याचीही सेवा देतं. गूगल मॅपद्वारे जगात कुठंही जाण्याचा मार्ग दाखवतं. गूगल न्यूज आपल्याला मिनिटामिनिटांची बित्तंबातमी देतं. जीमेल ही तर आता जवळपास एकमेव ईमेल सेवा बनण्याच्या दिशेने जात आहे. अलीकडील काळात कार्यालयीन बैठका गूगल मीटच्या माध्यमातून होताहेत. इतकं सगळं मोफत आहे, हे पाहून अनेकदा “गूगल’ ही चॅरिटेबल ट्रस्ट आहे की काय असं वाटू लागतं. पण वास्तव तसं नाही. गूगल ही जगातील सर्वांत मोठी अमाप नफा कमावणारी कंपनी आहे. मग हा पैसा येतो कुठून? “गूगल’चं नेमकं अर्थकारण काय आहे?
गूगल हे जगातील आजघडीला सर्वात मोठे सर्च इंजिन असून ते पैसे न मोजता सहजपणे उपलब्ध होते हे सर्वांनाच ठाऊक आहे. या माध्यमातून आपण आपल्या मनातील कोणत्याही म्हणजे जवळपास सर्वच प्रश्नांची उत्तरे शोधत असतो. गूगल सर्च इंजिनवर उत्तरे, मूव्ही, गाणे, फोटो आदी गोष्टी वाचून, ऐकून डाऊनलोड करुन साठवूही शकतो. यासाठी एक पैसाही द्यावा लागत नाही. एवढेच नाही तर गूगल मॅपच्या माध्यमातून मिळणाऱ्या मोफत माहितीवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवून कुठेही कानाकोपऱ्यात भटकंतीला किंवा प्रवासाला जाऊ शकतो.
गूगल न्यूज हे आपल्याला चोवीस तास अपडेट ठेवण्याचे काम करते. जी मेलमुळे जगातील एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात काही क्षणात कम्युनिकेशन करता येते आणि आज हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. अलीकडील काळात कार्यालयीन किंवा खासगी बैठका देखील गूगल मीटवर होत आहेत. एवढ्या सर्व जागतिक सुविधा एखाद्या सरकारने दिल्या असता तर आपल्याला किती कर भरावा लागला असता? मग गूगल ही चॅरिटेबल ट्रस्ट आहे का? अर्थातच याचे उत्तर नाही असे आहे. उलट गूगल ही जगातील सर्वात नफा कमावणारी कंपनी आहे.
तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वांत मोठ्या कंपन्यांमधील एक असलेली अल्फाबेट ही कंपनी गूगलची “पॅरेन्ट कंपनी’ आहे. गूगलच्या सर्च इंजिनवरून प्रत्येक सेकंदाला 63000 सर्च केले जातात. म्हणजेच एका सेकंदाला हे सर्च इंजिन 63000 वेळा प्रोसेस होते. या हिशेबाने दररोज सुमारे 5.5 अब्ज सर्च गूगलवरून केले जातात. वर्षभराच्या सर्चचा आकडा 2 लाख कोटींवर जातो. जी गोष्ट गूगल सर्च इंजिनची तीच यूट्यूबची. दर महिन्याला गूगलच्या यूट्यूबवर 2 अब्ज यूजर लॉग इन होतात. फोर्ब्जच्या अहवालात असे म्हटले आहे की, जी-मेलचे जगभरात 1.5 अब्ज यूजर आहेत. न्यूयॉर्क टाइम्समधील वृत्तांतानुसार, गूगल अँड्रॉइड, क्रोम, गूगल ड्राइव्ह, मॅप्स आणि गूगल प्ले स्टोअरचे जगभरा एक अब्जपेक्षा जास्त वापरकर्ते आहेत. जी-मेलकडे जगातील ई-मेल बाजाराच्या 43 टक्के शेअर आहे. 27 टक्के लोक जी-मेल फोनवरूनच ऑपरेट करतात. ईमेलच्या ऍक्सेससाठी 75 टक्क्यांहून अधिक लोक फोनचा वापर करतात.
गूगलमध्ये नोकरी करणे तर युवकांचे स्वप्न असते. कारण गूगल कंपनीची वेतनश्रेणी सर्वात श्रेष्ठ मानली जाते. विविध सरकारांनी वेळोवेळी गूगलवर कोट्यवधींची पेनल्टी देखील आकारली आहे आणि कंपनीकडून वसूलही केली आहे. मग शेवटी गूगल पैसा कसा कमावते? त्याचे बिझनेस मॉडेल काय आहे, असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. एका आकडेवारीनुसार गूगलची 96 टक्के कमाई ही केवळ जाहिरातीतूनच होते. याचाच अर्थ गूगलची बेहिशोबी कमाई ही गूगल सेवेत आपण न पाहिलेल्या किंवा स्किप केलेल्या जाहिरातीत दडलेली आहे. 2020 मध्ये गूगलची एकुण कमाई 146.9 अब्ज डॉलर होती तर 2021 मध्ये हीच कमाई 209.5 अब्ज डॉलरवर पोचली. गूगलच्या कमाईचे माध्यम म्हणजे जगभरातील लोकांच्या हातात असलेले मोबाइल, लॅपटॉप, संगणक, टॅबलेट आहे. आजकाल बहुतांश फोन अँड्राइड ऑपरेटिंग सिस्टिमवर अवलंबून आहे. अँड्राइड ही गूगलची कंपनी आहे. ऍपल आयफोन हा आयएओसवर काम करतो. त्यामुळे त्यांचे ट्रॅफिक गूगल सर्चवर वळविण्यासाठी गूगलला दरवर्षी मोठी रक्कम मोजावी लागते.
गूगल प्ले स्टोअरचा वापर हा मोबाइलवर मोफत ऍप्स इन्स्टॉल करण्यासाठी केला जातो. या ऍप्सना प्ले स्टोअरवर जागा देण्यासाठी गूगल त्यांच्याकडून शुल्कआकारणी करते. गूगलचे ऍडसेन्स नावाचे एक वेब आधारित ऍप्लिकेशन आहे. याच्या मदतीने संकेतस्थळ, ब्लॉग तसेच ऍप ओनर हे संकेतस्थळावर आणि ऍपवर जाहिराती दाखवून पैसे कमावतात. प्रत्यक्षात हे पैसे गूगलच कमावते आणि त्याचा एक वाटा त्या लोकांना दिला जातो, ज्यांचे संकेतस्थळ आणि ऍपचा वापर हा गूगलच्या जाहिराती दाखविण्यासाठी ऍडसेन्सच्या माध्यमातून केला जातो. इंटरनेटवर पॉर्न संकेतस्थळाचे वाढलेले प्रचंड प्रमाण हे वास्तविक वेब ट्रॅफिकला गूगल ऍडसेन्सच्या माध्यमातून आपल्या संकेतस्थळावर आणून त्यातून पैसा कमावण्याची चढाओढ ही देखील गूगलच्या कमाईचाच एक भाग आहे.
गूगल ऍड्स नावाने एडवर्ड ऍप्लिकेशन उपलब्ध आहे. हे देखील एक वेब आधारित ऍप्लिकेशन आहे. याच्या मदतीने आपण स्वत: जाहिराती तयार करू शकतो आणि त्यास गूगल हे यूट्यूबवर प्रसारित देखील करू शकते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ज्याप्रमाणे गूगल आणि यूट्यूबवर जाहिराती दिसतात, त्याचप्रमाणे आपणही जाहिराती दाखवू शकता. यासाठी गूगल हे आपल्याकडून काही पैसे घेईल. विशेष म्हणजे या माध्यमातून गूगलची सर्वाधिक कमाई होते. एका अहवालानुसार सध्याच्या काळात दर महिन्याला सुमारे शंभर कोटी नागरिक गूगल मॅपचा वापर करतात. मॅपवर येणाऱ्या यूजरकडून गूगलची बक्कळ कमाई होते. गूगल मॅपवर रेस्टॉरंट, हॉटेल, क्लिनिकल हॉस्पिटल, स्कूल आदींचे प्रमोशन केले जाते. आपण कदाचित पाहिले असेल की, जेव्हा मॅपमध्ये एखाद्या ठिकाणचे सर्च केले जाते तेव्हा त्याच्या परिसरातील दुकान, शाळा, हॉस्पिटल रेस्टॉरंट आदींचे विवरण सर्च रिझल्टखाली दिसते. त्याला टॉपवर ठेवण्यासांठी गूगल त्यांच्याकडून शुल्कआकारणी करत असते.
गूगल मॅप पार्टनरशिपच्या माध्यमातून देखील मोठी कमाई होते. आपण ऑनलाइन जेवण मागवले असेलच. स्विगी, झोमॅटो, उबर, ओला, आदी करंट लोकेशनचा वापर करतात आणि ही माहिती शेअर करण्यासाठी गूगल मॅप कंपनीकडून पैसे घेते. हा पैसा कमावण्याचा मोठा मार्ग आहे. वास्तविक गूगल ही अल्फाबेट इंकची साहायक कंपनी आहे. विशेष म्हणजे 2021 च्या आर्थिक वर्षात गूगलच्या जाहिरातीतून अल्फाबेटला त्याच्या एकूण महसुलाचे 82 टक्के उत्पन्न मिळाले होते. यूजरची वाढत्या संख्येने गूगलचे उत्पन्न देखील तेवढ्याच प्रमाणात वाढत आहे. तसेच यात आणखी भर पडतच राहणार आहे.
– महेश कोळी