पुणे, दि. 15 -पुणे विभागात ई-वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, यावर्षी पहिल्या सात महिन्यांत ई-वाहनांच्या संख्येत 150 टक्के वाढ झाल्याची माहिती पुणे परिवहन आधिकारी अजित शिंदे यांनी दिली. एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान 24 हजार 965 वाहनांची नोंद पुणे विभागात झाली आहे.
पेट्रोल आणि डिझेलवर असलेली भिस्त कमी करण्यासाठी आणि प्रदूषण टाळण्यासाठी 2030 पर्यंत 50 टक्क्यांहून अधिक वाहने विजेवर चालणारी करण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. ग्राहकांना प्रोस्तसाहन देण्यासाठी विजेवर चालणाऱ्या वाहनांवरील वस्तू आणि सेवा कर 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. तर दुसऱ्या बाजूला इंधनाचे दर गगणाला भिडत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
नागरिकांचा ई-वाहनांकडे कल वाढला आहे. कोरोना काळात वाहन खरेदी मंदावली असताना 2022-23 मध्ये मात्र वाहन खरेदीत वाढ झाली आहे. यात ई-वाहनांची संख्या अधिक आहे. पुणे विभागात 2021-22 मध्ये 22 हजार 398 ई-वाहनांनाची नोंद झाली आहे. यात 2022-23 मध्ये 150 टक्के वाढ झाली असून, पहिल्या सात महिन्यांत 24 हजार 965 ई-वाहनांची नोंद झाली आहे. आतापर्यंत पुणे विभागात एकूण 52 हजार 520 ई-वाहनांची नोंद झाली आहे.
ई-वाहने पर्यवरणपूरक असल्यामुळे ई-वाहनांसाठी शासन प्रोत्सहान देत असून, वस्तू आणि सेवा कर कमी केले आहेत. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. पुण्यातील ई-वाहनांच्या संख्येत 150 टक्केहून अधिक वाढ झाली आहे.
– अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे