मंचर : लौकी (ता. आंबेगाव) येथील रहिवासी असणारा फौजी सुधीर पंढरीनाथ थोरात (वय 32) यांचे मध्यप्रदेश ग्वालियर या ठिकाणी घोडस्वारीचा सराव करताना अपघाती निधन झाले.
फौजी सुधीर हे सन 2014 पासून भारतीय सुरक्षा फोर्समध्ये (बीएसएफ) कार्यरत होते. घोडस्वारीमध्ये त्यांनी अनेक राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदके मिळवलेली होती. पुढील दोन दिवसांत ग्वालियर या ठिकाणी घोडेस्वारीच्या इंटरनॅशनल स्पर्धा होणार होत्या. त्या स्पर्धेचा सरावादरम्यान रविवारी (दि. 13) दुपारी तीनच्या सुमारास त्यांचे घोड्यावरून पडून घोड्याची टाप डोक्याला लागल्याने अपघाती निधन झाले.
फौजी सुधीर हे गेल्या आठ वर्षांपासून देशसेवेसाठी प्रामाणिकपणे सेवा करत आहेत. त्यांच्या कुटुंबावर यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. फौजी सुधीर यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दीड वर्षाचा मुलगा, तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे. उद्योजक जयवंत थोरात हे त्यांचे चुलत भाऊ आहेत.
घोडस्वारी स्पर्धा संपल्यानंतर ते 30 नोव्हेंबरला सुट्टीवर येणार होते. फौजी सुधीर थोरात यांच्यावर अंत्यसंस्कार मंगळवारी (दि. 15) सकाळी आठ वाजता लौकी या गावांमध्ये जिल्हा परिषद शाळेजवळील जुन्या ग्रामपंचायत समोर शासकीय इतमामात होणार आहे. अशी माहिती उद्योजक जयवंत थोरात यांनी दिली.