केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल ः पुरंदर तालुक्यात मेळाव्यात संकल्प
सासवड : केंद्रीय नेतृत्व तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घरामध्ये उज्ज्वला गॅस, जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरी पाण्याचा नळ, पंतप्रधान आवास योजनेतील गरीब कुटुंबांना घरे देणे, प्रत्येक घरी विद्युत पुरवठा, गरीब शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजना दिल्या आहेत.
या योजनांचा प्रचार व प्रसार करून 2024 ला होणाऱ्या निवडणुकांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपाचा झेंडा फडकवण्याचे काम करण्याचा संकल्प सर्व कार्यकर्त्यांनी करावयाचा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्य मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी केले.
भिवरी (ता. पुरंदर) येथे प्रल्हादसिंह पटेल यांच्या उपस्थितीत बारामती लोकसभा प्रवासअंतर्गत शेतकरी व लाभार्थी मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. पटेल म्हणाले, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळत असते. यामध्ये ग्रामपंचायत पासून ते तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष येथे हे कार्यकर्ते पुढे येत असतात. यातूनच पक्ष भरारी घेतो. कार्यकर्त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवायचे आहेत.
याप्रसंगी बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी माजी मंत्री आमदार राम शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, सरचिटणीस ऍड. धर्मेंद्र खांडरे, बाबाराजे जाधवराव, राहुल शेवाळे, दिलीप खैरे, तालुकाध्यक्ष गंगाराम जगदाळे, जिल्हा उपाध्यक्ष गिरीश जगताप, सचिन लांबाते, पुरंदरचे माजी उपसभापती निलेश जगताप, श्रीकांत ताम्हाणे, हवेली मंडलाध्यक्ष धनंजय कामठे, कैलास जगताप, ऋतुजा जाधव उपस्थित होते.