मनरेगाचे काम 13 लाखांत, तर बांधकाम विभागाचा 27 लाखांचा खर्च
अपर मुख्य सचिवांकडून झाडाझडती
निधींमधील तफावत चव्हाट्यावर
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या कामकाजाच्या आढावा बैठकीत बांधकाम विभागातील कामांवर राज्याच्या ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी थेट बोट ठेवत दोन विभागातील निधीच्या तफावत खर्चावर बोट ठेवले.
मनरेगा’ मधून रस्त्याचे जे काम 13 लाख रुपयांमध्ये पूर्ण झाले. तेवढ्याच खर्चाचे काम बांधकाम विभागाने 27 लाख रुपयांना केले. ही बाब राजेश कुमार यांच्या निदर्शनास येताच त्यांनी विचारणा केली. मात्र त्यावर समाधानकारक उत्तर देताना जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली.
पुणे जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा आणि पाहणीसाठी राज्याचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी आज जिल्हा परिषदेत आले होते. कुमार यांचा दौरा अचानक नियोजित केल्याने जिल्हा परिषद प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती. त्यातच ते सर्व कामांचा आढावा घेणार असल्याने जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडून सर्व तयारी केली जात होती. मात्र शेवटी काही कामांतील तफावत राजेश कुमार यांच्या निदर्शनास आले. त्यांनी बांधकाम विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
राजेश कुमार यांचा दोन दिवसांचा दौरा आहे. पहिल्या दिवशी त्यांनी विविध कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांचा अधिकाऱ्यांच्या वतीने शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना घातलेली शाल जरीची होती. त्यावर ही शाल आहे की साडी असा प्रश्न केल्याने त्याचे अधिकचे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांना द्यावे लागले.
या दौऱ्यात राजेश कुमार यांना दाखवण्यासाठी ऐनवेळी चांगल्या ग्रामपंचायती, बचतगट तसेच कामे दाखवण्यासाठी चांगल्या कामांची शोधाशोध करावी लागली. कुमार यांनी शुक्रवारी मांजरी तसेच जिल्ह्यातील काही कामे पाहिली. ते उद्या (दि.12) भोर आणि मावळ मधील कामांची पाहणी करणार आहेत.
माझाच आढावा घेताय का?
राजेश कुमार यांनी जिल्हा परिषदेतील खातेनिहाय कामाचा आढावा घेत असताना यामध्ये अभ्यासिकांसाठी मान्यतेचा विषय मंत्रालयात आपल्या उपसचिवांकडे प्रलंबित असल्याचे अधिकारी सांगू लागले. आणखी काही विषय या स्वरूपाचे होते. जणू काही राजेश कुमार यांनाच विचारणा होत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी मला तुमचा आढावा देताय की माझाच आढावा तुम्ही घेताय’ अशी विचारणा करीत अधिकाऱ्यांची फिरकी घेतली.