नांदेड : गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती होण्याच्या चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. प्रकाश आंबेडकरांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेकडे युतीचा प्रस्तावदेखील दिला मात्र, शिवसेनेने या प्रस्तावावर कोणतेही भाष्य केलेले नाही. दरम्यान, आता पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार असल्याची माहिती समोर येत आहे. हे दोन्ही नेते एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर येणार असून त्यामुळे राज्यात पुन्हा नवीन राजकीय समीकरणे पाहायला मिळणार आहे.
येत्या २० नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी मुंबईतील शिवाजी मंदिरमध्ये प्रबोधन डॉट कॉम या नवीन संकेतस्थळाचे लोकार्पण होणार आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या निमित्ताने हे दोन्ही नेते एकत्र येणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते एकमेकांना साथ देतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि वंचितची युती होणार असल्याची चर्चा आहे. प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते आता एकाच मंचावर येणार असल्याने राज्यातील नव्या समीकरणाची ही नांदी तर नाही ना? अशी चर्चा जोर धरू लागली आहे.