पुणे, दि. 9 -पुणे रेल्वे स्थानकातील तीनपैकी केवळ एकच चौकशी खिडकी सुरू असल्याने प्रवाशांना ताटकळत थांबावे लागत आहे. स्टेशनवरील प्रवाशांची संख्या लक्षात घेता या खिडक्यांची संख्या वाढवणे आवश्यक असल्याची भावना प्रवाशांनी बोलून दाखवली.
पुणे रेल्वे स्थानकातून रोज 140 हून अधिक ट्रेन सुटतात. यातून रोज लाखो जण प्रवास करतात. पण, प्रवासादरम्यान किंवा आधी प्रवाशांना रेल्वे कोणत्या प्लॅटफॉर्मवर लागणार, रेल्वेची वेळ, रेल्वेचे नाव, इच्छित मार्गावरून जाणाऱ्या रेल्वेची नाव यासह अनेक समस्या भेडसवतात. काही व्यक्ती निरक्षर असतात. शिवाय परराज्यांतील प्रवाशांना माहिती मिळण्यासाठी अडचणी येतात. त्यांच्या मदतीसाठी रेल्वे स्थानकावर चौकशी खिडकीची सुविधा असते. पण, प्रवाशांची संख्या दिवसेदिवस वाढत असतानाही पुणे रेल्वे स्थानकावरील चौकशी खिडकींची संख्या अजूनही एकच आहे. त्यामुळे तिकीट काढण्याच्या वेळेपेक्षा चौकशी करण्यासाठी अधिक वेळ लागत आहे.
त्यातही प्रवाशांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने इतका वेळ थांबूनही त्यांच्या पदरी निराशाच पडत असल्याचे चित्र आहे.
स्टेशनवर पादचारी पुलावर गर्दी
पुणे रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलावर असलेल्या डिस्प्लेवर येणारी गाडी कोणत्या प्लॅटफार्म लागणार हे प्रवाशांना लवकर दिसत नसल्याचे बुधवारी सायंकाळी दिसून आले. त्यामुळे प्रवासी बराच वेळ पादचारी पुलावर थांबले होते. त्यामुळे पादचारी पुलावर मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. सायंकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी सुटणारी लोणावळा लोकल कोणत्या प्लॅटफार्मवर लागणार, हे सायंकाळी सहा वाजेपर्यंत डिस्प्लेवर दिसल नव्हते.
माझ्या गावी अचानक काम निघाल्यामुळे मी वाराणसीला जाण्यासाठी पुणे स्टेशनमध्ये आलो आहे. पण, येथून कोणती ट्रेन जाते आणि किती वाजता आहे हे माहिती नसल्यामुळे मी चौकशी खिडकीवर विचारण्यासाठी खूप वेळापासून उभा आहे. इतर चौकशी खिडकी उघडल्यास लवकर माहिती मिळण्यास मदत होईल.
– आकाश विश्वकर्मा, प्रवासी