शिमला – हिमाचल प्रदेशात कॉंग्रेस पक्षाचे सरकार येणार असून त्यानंतर जुन्या पेन्शन योजनेसह सर्व जुन्या योजना पुन्हा सुरू केल्या जातील असे आश्वासन कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिले. कॉंग्रेस भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखी पूर्ण न केली जाणारी आश्वासने देत नाही असा दावाही त्यांनी केला.
कॉंग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर खर्गे यांची बनूटी येथे आज पहिली प्रचारसभा झाली. कॉंग्रेसचे दिवंगत मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांच्या समर्थनासाठी खर्गे यांच्या या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले की हिमाचल प्रदेशची जनता सुशिक्षित आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी त्यांना मूर्ख बनवू शकत नाही.
पुढे खर्गे म्हणाले की, राज्यात 65 हजार सरकारी जागा रिक्त आहेत. केंद्राच्या 14 लाख जागा रिक्त आहेत. मात्र त्या भरल्या जात नाहीत. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी निवड कशी झाली कोणालाच माहिती नाही. भाजपमध्ये निवडणूक होत नाही. कॉंग्रेसमध्ये लोकशाही आहे. आमच्याकडे निवडणूक होते. राज्यात कॉंग्रेसचे सरकार स्थापन झाल्यावर महिलांना दरमहा 1500 रूपये दिले जातील. 1 लाख सरकारी नोकऱ्या दिल्या जातील.
Himachal Assembly Election 2022 : कॉंग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळ्यांची हमी – पंतप्रधान मोदी
अग्निवीर योजनेवरूनही त्यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. केवळ चार वर्षांसाठी युवकांना अग्निवीर केले जाते आहे. त्यानंतर त्यांनी काय करायचे? ते मंदिरात जाऊन घंटा वाजवणार का? लोकांची दिशाभूल करायची एवढेच त्यांना समजते व तीच त्यांची सवय आहे. कॉंग्रेसला आज कसे वाईट म्हणायचे याचीच त्यांना सकाळी दिवस उजाडल्यावर काळजी असते.