IND vs ENG – भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-२० विश्वचषकाचा दुसरा सेमीफायनल सामना गुरुवारी रंगणार आहे. आज म्हणजे बुधवारी झालेल्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम सामन्यात जागा मिळवली आहे. त्यामुळे आता भारत आणि इंग्लंड यांच्यात कोणता संघ बाजी मारणार? पाकिस्तान आणि भारत हे पारंपरिक प्रतिस्पर्धी अंतिम सामन्यात आमने-सामने दिसणार का? अशा अनेक कल्पना चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहेत.
“विराट मी तुला खूप सपोर्ट केलाय, मात्र तू इंग्लंडविरुद्ध धावा करू नको”
दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने सूर्यकुमार यादवबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. सूर्यकुमार विश्वचषक स्पर्धेत दमदार फलंदाजी करत आहे. त्याने ५ सामन्यांमध्ये जवळपास १८०च्या स्ट्राईक रेटने २२५ धावा केल्या आहेत. त्याच्या झिंबाब्वेविरुद्धच्या खेळीने सर्वांचीच मने जिंकली होती. त्या सामन्यात त्याने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत अवघ्या २५ चेंडूत ६१ धावांची नाबाद खेळी खेळली होती. या खेळीनंतर अनेकांनी त्याची तुलना ‘मिस्टर ३६०’ एबी डिव्हिलियर्सशी केली आहे.
बटलर सूर्यकुमारबाबत बोलताना म्हणाला की, “सूर्यकुमार यादव चांगली फलंदाजी करत आहे. माझ्या मते तो आतापर्यंत स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. तो मैदानावर मुक्तपणे खेळतो आणि अजिबात दडपण घेत नाही ही त्याची सर्वात मोठी ताकद आहे. त्याचबरोबर तो स्वतःला सर्व शॉट्स खेळण्यासाठी तयार करतो. मैदानात खेळताना त्याची मानसिकता पूर्णपणे मुक्त असल्याचे दिसते. मात्र, जगातील कोणत्याही फलंदाजाला बाद करण्यासाठी फक्त एका संधीची आवश्यक असते. आम्ही सामन्यात फक्त ती संधी शेधण्याचा प्रयत्न करू. तसेच भारतीय संघात सूर्यकुमार यादवशिवाय इतरही अनेक दिग्गज फलंदाज आहेत.”