मुंबई : शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रबोधन यात्रेतील मुक्ताईनगर सभेला प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यानंतर सुषमा अंधारेंनी जळगावात बोलताना ‘मी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा हिशोब मुक्ताईनगरमध्ये सभा घेऊनच करेन’, अशी प्रतिक्रिया दिली. यानंतर शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली. “माझा हिशोब चुकता करायचा असेल, तर सर्वांना माझं ‘ओपन चॅलेंज’ आहे”, असे आव्हान चंद्रकांत पाटलांनी दिले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी बोलताना, “सुषमा अंधारेंनी हिशोब चुकता करण्याबाबत वक्तव्य केल्याचे मी ऐकलं नाही. मात्र, कुणाला असा हिशोब चुकता करायचा असेल, तर त्यांना माझं कधीही ‘ओपन चॅलेंज’ आहे. त्या येऊ शकतात.”असे म्हटले आहे.
पुढे बोलताना त्यांनी,“ही लोकशाही शासन प्रणाली आहे. प्रत्येकाला इथं येण्याचा आणि सभा घेण्याचा अधिकार आहे.उलट आम्ही मदत करू, त्यांनी कधीही यावं आणि सभा करावी,” असे मत चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केले आहे.
एकनाथ खडसे यांनी शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिरात राज्य सरकारची बदनामी करा असे वक्तव्य केले. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटलांनी एकनाथ खडसे यांच्याकडून कोणतेही चांगले काम होऊ शकत नाही, असे म्हणत टोला लगावला.