चीनचे नवे पंतप्रधान म्हणून लि यांचे नाव
पेकिंग, दि. 1 – चीनचे नवे पंतप्रधान म्हणून लि सिएन-निएन यांचे नाव पुढे आले आहे. तसेच संरक्षणमंत्री येह हिंम-यिंग यांची नॅशनल पीपल्स कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी नेमणूक झाल्याची वार्ता आहे. उपपंतप्रधान लि हे 71 वर्षे वयाचे असून दिवंगत पंतप्रधान चौ एन-लाय यांचे निकटचे सहकारी होते तसेच, ते अर्थशास्त्रातील फार मोठे तज्ज्ञ आहेत.
नॅशनल पीपल्स कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची जागा ही राज्यप्रमुखाच्या जागेइतकीच महत्त्वाची आहे. मार्शल चू तेह यांच्या निधनानंतर जुलै महिन्यापासून ही जागा रिकामी होती.
वृत्तपत्रांच्या खपात नेत्रदीपक वाढ
नवी दिल्ली – लोकसभेत सादर केलेल्या रजिस्ट्रार ऑ अ न्यूज पेपर्सच्या अहवालानुसार 1974 मध्ये वृत्तपत्राच्या खपात नेत्रदीपक वाढ झाली आहे. या कालावधीत खपात 23 टक्के म्हणजे 31 लाख प्रतींची वाढ झाली. दैनिकांमध्ये फक्त 22 दैनिके एक लाखापेक्षा अधिक खपाची आहेत.
एकूण खपात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असून त्यातील खप 365.15 लाख आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक 135 दैनिके प्रसिद्ध झाली. त्यानंतर महाराष्ट्राचा (111) क्रमांक लागतो. मुंबई येथील “मुंबई समाचार’ (स्थापना 1822) हे गुजराती दैनिक देशातील सर्वात जुने वृत्तपत्र आहे.