मुंबई – विजयादशमीचा मुहूर्त साधत शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंनी तर बीकेसीच्या मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दसरा मेळावा घेतला. या मेळाव्यांतून दोन्हही नेत्यांनी आपले विचार कार्यकर्त्यापर्यंत पोहचवले. त्यानंतर इतर पक्षाच्या अनेक नेत्यांनी या मेळाव्यांबाबत आपली प्रतिक्रिया देखील दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेंना देखील या मेळाव्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली त्यानंतर त्यांनी अवघ्या एका वाक्यात आपले म्हणणे मांडले.
अमित ठाकरे सध्या पक्ष संघटनेमध्ये लक्ष देताहेत. यासाठी त्यांनी नव्या उपक्रमाला सुरुवात केली आहे. यानुसार सध्या मराठवाडा महासंपर्क अभियान राबवले जात आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत दसरा मेळाव्याबाबत भाष्य केलं आहे.
तुम्ही एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा पाहिला की उद्धव ठाकरेंचा ? असा सवाल अमित ठाकरेंना माध्यमकर्मींनी विचारला असता,”मी कोणताही दसरा मेळावा पाहिला नसल्याची प्रतिक्रिया अमित ठाकरेंनी दिली आहे. मनसे विद्याथी सेनेच्या पुनर्बांधणीसाठी हा दौरा असल्याचे अमित ठाकरेंनी यावेळी सांगितले. गणेशोत्सव आणि नवरात्रीमुळे हा उपक्रम थांबला होता परंतु आता पुन्हा सुरु करण्यात आला आहे. यामध्ये अनेक तरुण तरुणी सहभागी होणार आहेत आणि याचा अहवाल राज ठाकरेंना देखील देण्यात येणार असल्याची माहिती अमित ठाकरेंनी यावेळी दिली.