पर्यटन दिन विशेष; एक कोटी ३५ लाख निधी चार वर्षापासून वापराविना पडून, पालकमंत्री आता तरी लक्ष देणार का?
विजय लाड
कोयनानगर – पर्यटन पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना पर्यटन क्षेत्राची गेल्या दोन वर्षापासून पीछेहाट झाली आहे. कोयनेच्या पर्यटनाला लागलेल्या समस्यांचे ग्रहण नकारात्मक दृष्टिकोन ठेवून कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे सुटत नाही. चार वर्षापासून कोयना पर्यटन विकासासाठी मंजूर असलेला १ कोटी ३५ लाख रूपयांचा निधी वापराविना पडून आहे. यामुळे कोयनेची पर्यटन क्षेत्रातील घौडदौड रोखली गेली आहे.
थंड हवेचे नवे ठिकाण, वीकेंड डेस्टिनेशन म्हणून कोयना परिसराने जगभरातील पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले आहे. पर्यटनाच्या तिन्ही हंगामामध्ये कोयनेत पर्यटकांची तोबा गर्दी असते. त्यामुळे जागतिक क्रमवारीच्या यादीत कोयना नाव आपसूकच गेले आहे. ‘विधात्याला पडलेलं सुंदर स्वप्न’ अशी ओळख असणारा हा परिसर पर्यटकांचा ‘फेव्हरेट पॉईंट’ झाला आहे. जगप्रसिद्ध कोयना धरण, कोयना जलविद्युत प्रकल्प, मनमोहक ओझर्डे धबधबा, नयनरम्य नेहरू स्मृती उद्यान, कोयना अभयारण्य, घाटमाथा परिसर ही कोयनेची मनमोहक ठिकाणे आहेत.
या परिसराचा विकास करण्याबरोबर कोयना परिसरातील काही नवीन ठिकाणे विकसित करण्यासाठी तालुक्याचे लोकप्रतिनिधी उत्पादन शुल्क मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कोयना पर्यटन विकास आराखडा तयार केला आहे.
शासनाच्या पर्यटन विभागाकडून २०१८-१९ पासून कोयना पर्यटन आराखड्याला २ कोटी ५ लाख रूपयांचा निधी देण्यात आला आहे. यातील २०१८-१९ साठी २१ लाख रुपये, तर २०-२१ मध्ये ५० लाख रुपये खर्च करण्यात आला. परंतु, या आराखड्यातील १ कोटी ३४ लाख रूपयांचा निधी ४ वर्षापासून तसाच वापराविना पासून आहे. पर्यटन विभाग खर्च करत असल्याने जलसंपदा विभागाने खर्च केला नाही. तर वन्यजीव विभागाने खर्च केलेल्या निधीचे भुसल्खन झाले आहे. कोयना पर्यटनाची नोंद २०१८-१९ पासून जागतिक क्रमवारीत झाली आहे.
नेहरु उद्यान हे पर्यटकांचे आकर्षण केंद्र असले तरी नेहरू उद्यानाची बकाल अवस्था आहे. उद्यान निर्मिती झाल्यापासून गंजलेली खेळणी या उद्यानाच्या दूरवस्थेचा नमुना ठरत आहे. अधिकारी नकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करत असल्याने लाखों रूपयांचा निधी मिळूनही या उद्यानाला आधुनिकतेचा लुक येत नाही. यामुळेच हे उद्यान २२ वर्षांत ‘एस्सेल वर्ल्ड’ होऊ शकले नाही.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या आग्रही मागणीमुळे कोयना पर्यटन विकास आराखड्याला ३ कोटी ५ लाख निधी मंजूर आहे. त्यातील १ कोटी ३४ लाख हा जुना निधी आहे. तर १ कोटी रुपयेचा निधी निसर्ग परिचर केंद्रासाठी आला आहे. १ कोटी ३४ लाख रुपये निधीचा वापर तातडीने करावा अशा सूचना कोयना प्रकल्पाला केल्या आहेत.
– शशिकांत माळी (जिल्हा नियोजन अधिकारी).
मंत्र्यांचे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना खडे बोल
पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ऑगस्ट महिन्यात याचा आढावा घेऊन कोयना प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौकशी आदेशातून सरकार गेल्यामुळे त्या प्रकरणातून सहीसलामत सुटलेले कोयना प्रकल्पाचे आधिकारी हे मंत्रीमहोदयांना गांभीर्याने घेत नाहीत; की पालकमंत्री शंभूराज देसाई कोयनेच्या अधिकाऱ्यांना गांभीर्याने घेत नाहीत, हे कोडेच आहे.