सातारा – जिल्ह्यात महाबळेश्वर तालुका वगळता संपूर्ण जिल्ह्यात लंपी स्किनचा प्रादुर्भाव असून शुक्रवारअखेर जिल्ह्यात 42 जनावरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शुक्रवारी एका दिवसात पाच जनावरांचा मृत्यू झाला आहे.
71 गावांमधील 573 जनावरे बाधित असून 82 जनावरे नियमित औषधोपचाराने बरी झाली आहेत. जिल्ह्यात एक लाख 43 हजार 63 जनावरांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली.
लंपी स्किनचा प्रादुर्भाव महाबळेश्वर वगळता दहा तालुक्यांत झाला आहे. जिल्ह्यात 2 लाख 81 हजार 900 एवढ्या लसमात्रा उपलब्ध आहेत. लंपी स्किन आजार औषधोपचाराने बरा होत असल्याने पशुपालकांनी लक्षणे आढळून आल्यास त्यांची माहिती तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात अथवा पशुसंवर्धन विभागाच्या टोल फ्री क्र.18002330418 अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. 1962 यावर तात्काळ द्यावी, असे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले आहे.