सातारा -जिल्ह्यात लंपी स्किनचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून मंगळवारअखेर चार तालुक्यांतील 123 जनावरांना लंपी स्किनची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सोमवारी कराड तालुक्यात एका बैलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
लंपी स्किनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने सुमारे 20 हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली. वाघेरी (ता. कराड) येथे लंपी स्किन आजाराची सुरुवात झाली होती.
कराडनंतर फलटण तालुक्यात लंपी स्किनचा शिरकाव झाला. त्यानंतर सातारा तालुक्यात महिगाव, पांढरवाडी येथे बाधित जनावरे आढळून आली. बाधित जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आता खटाव तालुक्यातही लंपी स्किनचा शिरकाव झाला आहे. कटगुण, कलेढोण, राजापूर, खटाव गावांमध्ये बाधित जनावरे आढळली आहेत. या पार्श्वभूमीवर बाधित क्षेत्रात पाच किलोमीटर परिसरात पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण करण्यात येत आहे. पशुपालकांनी घाबरुन न जाता पशुसंवर्धन विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले आहे.