कोयनानगर – कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या 24 तासांत कोयनानगर येथे 116, नवजा 142 आणि महाबळेश्वर 122 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाचा एकूण पाणीसाठा 102.32 टीएमसी झाला असून जलाशयात प्रति सेकंद 18275 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. कोयना धरणात पाण्याची होणारी आवक लक्षात घेता धरण व्यवस्थापनाने मंगळवारी दुपारी 2 वाजता यावर्षी दुसऱ्यांदा धरणाचे 6 वक्र दरवाजे पुन्हा दीड फुटाने उचलले आहेत.
धरण पाणलोट क्षेत्रात सर्वदूर जोरदार पाऊस पडत आहे. पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे मंगळवारी दिवसभरात 71, नवजा येथे 79, तर महाबळेश्वर येथे 34 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात 24 तासांत एक टीएमसीने वाढ झाल्यामुळे धरणाचे 6 वक्र दरवाजे दीड फुटाने उचलण्यात आले. सध्या धरणातून कोयना नदीपात्रात 13139 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गतवर्षी याच दिवशी कोयना धरणात 104.28 टीएमसी पाणीसाठा होता, अशी माहिती धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आली.
आज विसर्ग वाढणार
कोयना धरण पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढल्याने उद्या दि. 14 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 3 फुट 6 इंच उघडून 30,660 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. धरण पायथा विद्युत गृहामधून 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग चालू असल्याने धरणातून कोयना नदीपात्रात एकूण 31,710 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू राहणार आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.