कैरो, (इजिप्त) – इजिप्तमधील कॉप्टिक चर्चला लागलेल्या भीषण आगीमध्ये किमान 41 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीमध्ये अन्य 14 जण जखमी झाले आहेत. इंबाबा या अतिशय दाट लोकवस्तीच्या जवळच्या अबू सेफीन चर्चला ही आग लागली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतेह अल सिसी यांनी सर्व यंत्रणांना सक्रिय करून आवश्यक त्या हालचाली करण्याचे आदेश दिले आहेत. ही आग आता आटोक्यात आणली गेली असल्याचे त्यांनी फेसबुकवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. सिसी यांनी फोनवरून कॉप्टिक ख्रिश्चन पोप तवाद्रोस दुसरे यांच्याशी चर्चा केली आणि या आगीत मरण पावलेल्यांप्रती आपल्या सहवेदना व्यक्त केल्या.
कॉर्टिक ख्रिस्चन समुदाय केवळ मध्यपूर्वेत आढळतो. इजिप्तच्या प्रामुख्याने मुस्लिम समुदायाच्या तुलनेत कॉप्टिक समुदायाचे प्रमाण 10 टक्के एवढे आहे. अल्पसंख्य कॉप्टिक समुदायावर मुस्लिम बहुसंख्य देशांमध्ये हल्ले होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.