ओआगदुआंगो (बुर्किना फासो) – आफ्रिकेतील बुर्किना फासोमधील एका गावामध्ये कट्टरवाद्यांनी एका कॅथोलिक चर्चवर केलेल्या हल्ल्यामध्ये किमान १५ जण ठार झाले आहेत. रविवारच्या साप्ताहिक प्रार्थनेसाठी हे सर्वजण चर्चमध्ये जमले असताना हा हल्ला झाला होता.
देशाच्या उत्तरेकडील इस्साकेन या गावामध्ये झालेला हा हल्ला म्हणजे दहशतवादी हल्ला असल्याचे स्थानिक चर्चच्या पदाधिकार्यांनी म्हटले आहे. मृतांपैकी १२ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर तिघे उपचारादरम्यान मरण पावले.
अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. चर्चमध्ये घुसून करण्यात आलेल्या या गोळीबाराची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. बुर्किना फासोमध्ये कट्टरवाद्यांकडून असे हल्ले अधून मधून केले जात असतात.
ख्रिश्चन चर्चवरील हल्ल्यांबरोबर धर्मगुरूंचे अपहरण देखील केले जात असते. बुर्किना फासोमध्ये २०२२ मध्ये दोनवेळा बंड झाले होते. तेंंव्हापासून देशाची सत्ता ताब्यात घेण्यासाठी अनेक गट प्रयत्नशील आहेत.