लंडन – ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी प्रमुख दावेदार असलेल्या लिझ ट्रस यांनी भारतीय वंशाचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्यावर आता निर्णायक आघाडी घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हुजूर पक्षाच्या सदस्यांच्या आतापर्यंत झालेल्या मतदानाच्या आधारे घेण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार ट्रस यांच्याकडे सुनक यांच्यापेक्षा 22 गुण अधिक आहेत.
एका दैनिकाने घेतलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणानुसार हुजूर पक्षाच्या 570 सदस्यांपैकी ट्रस यांना 61 टक्के सदस्यांनी पसंती दिली आहे. तर सुनक यांना 39 टक्के सदस्यांनी पसंती दिली आहे. हुजूर पक्षाच्या सदस्यांचे मतदान संपण्यासाठी आणखीन 3 आठवड्यांची मुदत आहेत. 2 सप्टेंबर रोजी हे मतदान संपणार आहे.
येत्या काही दिवसात सुनक यांना ट्रस यांची ही आघाडी मोडून काढण्याचे अवघड आव्हान पार पाडावे लागणार आहे. मात्र ही एवढी मोठी आघाडी भरून काढणे जवळजवळ अशक्य मानले जाते आहे. त्यामुळे ट्रस आता पंतप्रधान बनणार नाहीत, हे केवळ अशक्य मानले जाते आहे. सुनक यांच्या आर्थिक नियोजनावर विश्वास असणाऱ्या सदस्यांची संख्या जरी जास्त असली तरी ती संख्या ट्रस यांच्या पाठिराख्यांपेक्षा अधिक नाही.
बोरीस जॉन्सन यांच्या पर्यायी नेत्याच्या नावासाठी केलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणात 63 टक्के सदस्यांनी जॉन्सन हेच पंतप्रधान असावेत असे म्हटले आहे, हे आश्चर्याचे आहे. उर्वरित 22 टक्के सदस्यांनी ट्रस या पर्यायी पंतप्रधान असाव्यात असे म्हटले आहे. दुसरीकडे सुनक हे पंतप्रधान होण्यापेक्षाही जॉन्सन हेच पंतप्रधान चालतील असे 68 टक्के सदस्यांनी म्हटले आहे. हुजूर पक्षाच्या 29 टक्के सदस्यांनी आतापर्यंत मतदान केलेले आहे. 47 टक्के सदस्यांनी कोणाला मतदान करायचे हे निश्चित ठरवले आहे. केवळ 10 टक्के सदस्यांनी अद्याप आपला निर्णय निश्चित ठरवलेला नाही.