भवानीनगर :- इंदापूर-बारामती या महत्त्वाच्या वर्दळीच्या रस्त्यावर काटेवाडी (ता. बारामती) येथे रस्त्यावर मोठे झाड पडल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
शुक्रवारी (दि. 5) दुपारी साडेचार वाजता इकाटेवाडी येथे रस्त्यावर निलगिरीचे मोठे झाड पडले. या झाडाचा बुंधा कुजल्याने हे झाड आज अचानक रस्त्यावरती आडवे पडल्याने बारामतीकडून येणारी वाहने व इंदापूर कडून येणारी वाहने एक तास थांबून राहील त्यामुळे महत्त्वाच्या कामासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या अडचणी निर्माण झाल्या होत्या.
ही घटना समजतात काटेवाडी वितरण विभागाचे कनिष्ठ अभियंता सूरज ठोंबरे, कर्मचारी संदीप पाटोळे, सतीश झगडे, अमोल गवळी, सचिन सोलणकर, गणेश चव्हाण या ठिकाणी आले. तातडीने खांबावरील असलेल्या विजेच्या तारा खाली पडलेल्या होत्या. त्या वीज पुरवठा खंडित करून काही तारा तोडल्याने खांबांवरील ताण कमी झाल्याने पुढील अनर्थ टळला.
यावेळी स्थानिक नागरिक दत्तात्रय काटे यांच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने झाड बाजूला करण्याचा प्रयत्न केला; परंतु झाड मोठे होते. पालखी मार्गाचे काम सध्या सुरू असल्याने येथील अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले असता त्यांनी हे झाड तातडीने बाजूला काढले.