उल्हासनगर – ठाणे, कल्याण डोंबिवली आणि अंबरनाथपाठोपाठ आता उल्हासनगरमध्येही शिवसेनेत मोठी फूट दिसून आली आहे. उल्हासनगर शिवसेनेचे 25 नगरसेवक होते. त्यातील 15 नगरसेवक शिंदे गटात सामील झाले असून येत्या काही दिवसांत इतरही अनेक जण येतील, अशी आशा व्यक्त केली आहे.
उल्हासनगर शहरातील शिवसेनेच्या 15 माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. आज (बुधवार) गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने ठाण्यातील आनंदाश्रम येथे या नगरसेवकांनी हजेरी लावली. उल्हासनगरात शिवसेनेचे 25 नगरसेवक होते, त्यापैकी 15 नगरसेवक गेल्याने शिवसेनेला भगदाड पडले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतील अनेक निष्ठावान कार्यकर्ते, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले आहे. त्यातच, आज उल्हासनगरसह नाशिकमधीलही अनेक नगरसेवकांनी शिंदे गटाला समर्थन दिले आहे.