महिलेचा मृत्यू कर्करोगाने झाल्याचा संशय
कैरो : इजिप्तच्या विविध भागांमध्ये ममी सापडणे ही एक सर्वसाधारण बाब असली तरी काही वर्षांपूर्वी सापडलेली एक ममी एका गरोदर महिलेची असल्याचे सिद्ध झाल्याने संशोधकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण गरोदर महिलेची अशाप्रकारची ममी प्रथमच सापडत आहे. ही ममी तब्बल दोन हजार वर्षे जुनी आहे.
शास्त्रज्ञांनी या महिलेचा मृत्यू कशामुळे झाला याचा शोध सुरू केल्यानंतर तिला कर्करोगाचा आजार असल्याचे निष्पन्न झाले. शास्त्रज्ञांनी तिच्या या ममीच्या मेंदूचे स्कॅनिंग केले असता त्यांना त्या मेंदूमध्ये ट्यूमर सदृश काही खुणा आढळल्या कर्करोगासारखा एखाद्या आजाराने या महिलेचा मृत्यू झाला असला तरी तिच्या मृत्यूनंतर काही काळ तिच्या पोटातील गर्भ मात्र जिवंत होता असा दावाही संशोधकांनी केला आहे.
पुरातन काळातही कर्करोगासारखे विकार होते हे सिद्ध करणारे हे संशोधन असेल असाही आता शास्त्रज्ञांनी दावा केला आहे. प्रथम जेव्हा ही ममी सापडली तेव्हा ती पुरातन काळातील एखाद्या मंदिरातील पुजाऱ्याची असावी असा शास्त्रज्ञांचा कयास होता, पण तज्ञ एका पथकाने या ममीवर विशेष संशोधन केल्यानंतर ही मंडळी एका गर्भवती महिलेची असल्याचे निष्पन्न झाले. या ममीच्या गर्भाशयात मृत झालेल्या गर्भाचे काही अवशेषही शास्त्रज्ञांना सापडले आहेत.