डेहराडून : देशातील पवित्र अशा 12 ज्योतिर्लिंगापैकी केदारनाथ मंदिर एक मानले जाते. याठिकाणी पांडवांना भगवान महादेवाचा आशीर्वाद मिळाला होता अशी अख्यायिका आहे. त्या आशीर्वादामुळे पांडवांना बंधूहत्येच्या पापातून मुक्ती मिळाली. अशा या केदारनाथ मंदिराविषयी रंजक माहिती. केदारनाथ उत्तरखंडातील रुद्रपयाग जिल्ह्यात आहे. ते समुद्रसपाटीपासून 3593 फूट उंचीवर आहे. अत्यंत भव्य आणि पुरातन असे हे मंदिर म्हणजे बारावे ज्योतिर्लिंग मानले जाते.
केदारनाथाविषयी सांगतिल्या जाणाऱ्या कथेनुसार महाभारतातील युद्धानंतर पांडवांना भावंडांना ठार मारल्याच्या पापातून मुक्त व्हायचे होते. त्यामुळे श्रीकृष्णाने पांडवाने भगवान महादेवाचा आशीर्वाद घेण्यास सांगितले. श्रीकृष्णाच्या सल्ल्यानुसार पांडव त्यासाठी काशीला पोचले. त्यावेळी भगवान महादेवाची पांडवांना दर्शन देण्याची इच्छा नव्हती त्यामुळे ते हिमालयातील गुप्तकाशीमध्ये लपून बसले. पांडवांना ही गोष्टी माहित झाली. त्यामुळे पांडव गुप्तकाशीत येण्याआधीच महादेव केदारनाथला पोचले आणि तिथे नंदीचे रुप धारण करून अन्य जनावरांच्या कळपात घुसले.
हे सगळे पांडवांना संशयास्पद वाटल्याने भीमाने विशाल रुप धारण केले आणि दोन पर्वतांवर आपले पाय ठेवले. त्याच्या पायाखालून सगळी जनावरे जात होती, गाय-बैल जात होते. परंतु भगवान शिवरूपी नंदीबैल त्याच्या पायाखालून गेला नाही.
त्यामुळे त्याला पकडण्यासाठी भीमाने हात पुढे केला तर तो बैल जमिनीत अंतर्धान पावला. त्याचवेळी भीमाने बैलाच्या पाठीवरील त्रिकोणी भाग हातात पकडला. त्यामुळे पांडवांची भक्ती पाहून भगवान महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी पांडवांना दर्शन देऊन पापमुक्त केले अशी कथा सांगितली जाते.
तेव्हापासून बैलाच्या पाठीची त्रिकोण आकृती पिंडीच्या रुपामध्ये केदारनाथ येथे पुजली जाते. अंतर्धान पावलेले बैलाचे उरलेले शरीर काठमांडूमध्ये प्रकटले. त्याला पशुपतिनाथ म्हटले जाते.
देशातील 12 ज्योतिर्लिंगे –
1) सोमनाथ – सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरातमधील सौराष्ट्रात आहे. त्याठिकाणी पवित्र कुंड आहे. त्याला सोमकुंड म्हटले जाते.
2) मल्लिकार्जुन – आंध्र प्रदेशात कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर श्री शैल डोंगरावर मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे.
3) महाकालेश्वर – मध्य प्रदेशातील उज्जैन येथे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे. हे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे.
4) ओंकारेश्वर – मध्य प्रदेशातील माळवा भागातील इंदूरनजीक नर्मदा नदीच्या किनारी ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे.
5) केदारनाथ – उत्तराखंड राज्यातील रूद्रप्रयाग जिल्ह्यात केदारनाथ आहे. तुलनेत याठिकाणी जाणे कष्टाचे आहे.
6) भीमाशंकर – महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात सह्याद्री रांगांमधील डोंगरावर भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे. श्रावणातील सोमवारी या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते.
7) काशी विश्वनाथ – उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे गंगा नदीच्या किनाऱ्यावर काशीविश्वनाथाचे भव्य मंदिर आहे.
8) नागेश्वर – महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे हे ज्योतिर्लिंग आहे. पांडवांच्या 14 वर्षांच्या वनवासात धर्मराज युधिष्ठिराने हे मंदिर बांधून महादेवाची स्थापन केली.
9) वैजनाथ – महाराष्ट्रातील परळी येथे प्रसिद्ध वैजनाथ ज्योतिर्लिगाचे मंदिर आहे.
10)रामेश्वर – तमिळनाडूतील रामनाथम समुद्रकिनाऱ्यावर भव्य असे प्राचीन रामेश्वर मंदिर उभे आहे. याची स्थापना स्वतः प्रभूरामचंद्राने केली होती असे सांगितले जाते.
11) त्र्यंबकेश्वर – महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर याठिकाणी हे ज्योतिर्लिंग आहे.
12) घृष्णेश्वर – महाराष्ट्रातील वेरूळ येथे ज्योतिर्लिंग होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे याठिकाणी पूजाअर्चा करत असत.