पालेकेल्ले – भारताच्या महिला क्रिकेट संघाने फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रांत अफलातून कामगिरी करताना यजमान श्रीलंका महिला संघाचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात 4 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
श्रीलंकेची कर्णधार चामरी अटापट्टीने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अटापट्टूसह प्रमुख फलंदाज अपयशी ठरत असताना निलाक्षी डीसील्व्हा, हसीनी परेरा व हर्षिता मडवी यांनी थोडीफार चमक दाखवली, त्यामुळे श्रीलंकेच्या संघाला 48.2 षटकांत सर्वबाद 171 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. भारताच्या दीप्ती शर्मा, रेणुका सिंग व पूजा वस्त्रकार यांनी अफलातून गोलंदाजी करत त्यांचा डाव मोजक्या धावसंख्येवर रोखला.
विजयासाठी आवश्यक धावांचा पाठलाग करताना भारताच्या डावाची सुरुवातही निराशाजनक झाली. स्टार फलंदाज स्मृती मानधना व यस्तिका भाटीया यांनी साफ निराशा केली. मात्र, कर्णधार हरमनप्रीत कौरने शफाली वर्मा व हरलीन देओलच्या साथीत संघाच डाव सावरलाच नाही तर संघाला विजयाचा विश्वासही मिळवून दिला.
हरमनने 44, शफालीने 35 व हरलीनने 34 धावांची खेळी केली. दीप्ती शर्माने गोलंदाजीत 3 गडी बाद करत फलंदाजीतही आपली क्षमता सिद्ध केली. तिने नाबाद 22, तर पूजा वस्त्रकारने नाबाद 21 धावांची खेळी करत संघाचा विजय साकार केला. या जोडीने 38 षटकांत 6 गडी गमावून 176 दावा करत विजय साकार केला. श्रीलंकेकडून इनोका राणावीराने 4 गडी बाद केले. ओशाडी रणसिंगेने 2 बळी घेतले. मात्र, दीप्ती व पूजाने त्यांच्यावर वर्चस्व राखले व भारताला मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
संक्षिप्त धावफलक –
श्रीलंका – 48.2 षटकांत सर्वबाद 171 धावा. (निलाक्षी डीसील्व्हा 43, हसीनी परेरा 37, हर्षिता मडवी 28, दीप्ती शर्मा 3-25, रेणुका सिंग 3-29, पूजा वस्त्रकार 2-26). भारत – 38 षटकांत 6 बाद 176 धावा. (हरमनप्रीत कौर 44, शफाली वर्मा 35, हरलीन देओल 34, दीप्ती शर्मा नाबाद 22, पूजा वस्त्रकार नाबाद 21, इनोका राणावीरा 4-39, ओशाडी रणसिंगे 2-34).