क्विन्सटाऊन – यजमान न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाने एकमेव टी-20 सामन्यात भारताच्या महिला संघाला 18 धावांनी पराभूत केले. या सामन्यात भारताच्या महिला संघाने गोलंदाजीत मिळवलेल्या यशावर फलंदाजांनी केलेल्या अपयशी कामगिरी केल्याने पाणी फेरले गेले.
या सामन्यात भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकत न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. सुझी बेट्स, सोफी डीव्हाइन, लि तहु व मॅडी ग्रीन यांनी केलेल्या उपयुक्त कामगिरीच्या जोरावर 5 गडी गमावून 155 धावा केल्या. भारताकडून पुजा वस्त्रकार व दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
विजयासाठी 156 धावांचा पाठलाग करताना साबीनेनी मेघना व यास्तिका भाटिया यांचा अपवाद वगळता अन्य एकाही फलंदाजाला सरस कामगिरी करता आली नाही व त्यांचा डाव 8 बाद 137 असा रोखत न्यूझीलंडने विजय मिळवला. न्यूझीलंडकडून जेसी व अमेलिया केर तर हेली जेन्सन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – न्यूझीलंड – 20 षटकांत 5 बाद 155 धावा. (सुझी बेट्स 36, सोफी डीव्हाइन 31, लि तहु 27, मॅडी ग्रीन 26, पुजा वस्त्रकार 2-16, दीप्ती शर्मा 2-26). भारत – 20 षटकांत 8 बाद 137 धावा. (साबीनेनी मेघना 37, यास्तिका भाटिया 26, जीस केर 2-20, अमेलिया केर 2-25, हेली जेन्सन 2-25).