बर्मिंगहॅम – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत लॉन बॉल्स प्रकारात भारताच्या महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. लॉनबॉल्समध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारा पहिलाच संघ आशी भारताच्या महिला संघाची नवी ओळख बनली.
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा मंगळवारी झालेल्या अंतिम सामन्यात 17-10 असा धुव्वा उडवला. या संघात लव्हली चौबे, पिंकी, नयनमोनी सौकिया व रूपा राणी तिर्की यांचा समावेश होता. रूपा राणी तिर्की हीच या संघाची कर्णधार होती.
या सामन्यात भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात 2-2 अशी बरोबरी होती. त्यानंतर भारताने 4-2 अशी आघाडी घेत आठव्या एंडनंतर ही आघाडी 8-4 अशी वाढवली. त्यानंतर मात्र दक्षिण आफ्रिकेने खेळ उंचावताना थाटात पुनरागमन करत ही आघाडी भरून काढताना दहाव्या एंडला 8-8 अशी बरोबरी साधली.
11 व्या एंडनंतर दक्षिण आफ्रिकेनेच भारतावर वर्चस्व राखत 10-8 अशी आघाडी घेत सामन्याचे चित्र काहीकाळ पालटवले. यावेळी 12 व्या एंडनंतर भारताने ही पिछाडी भरून काढताना सामना 10-10 असा बरोबरीत आणताना आपली कामगिरी उंचावली. त्यानंतर 13, 14 व अखेरच्या 15 व्या एंडमध्ये भारतीय संघाने 17-10 अशा आघाडीसह सामना व सुवर्णपदक जिंकले.