मुंबई – जे आता भाजपासोबत जाऊ इच्छित आहेत किंवा गेलेत त्यांनी हा प्रश्न स्वत:च्या मनाला विचारला पाहिजे. अडीच वर्षांपूर्वी ज्यांनी शब्द मोडला आणि अशा पद्धतीने पाठीवर वार करुन पुन्हा एकदा शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणत आहेत. तर तसा हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नव्या सरकारचे अभिनंदन केले. याशिवाय त्यांनी यावेळी पुन्हा 2019 विधानसभा निवडणुकीवेळी भाजपसोबत झालेल्या अडीच-अडीच वर्षांच्या सत्तेसंदर्भातील चर्चेवर भाष्य केले. तसेच आरे कारशेडचा मुद्दाही उपस्थित केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन केले आणि ज्यांनी हे सरकार स्थापन केले त्यांच्या मते तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले. मग हेच तर मी अडीच वर्षांपूर्वी सांगत होतो. माझ्यात आणि अमित शहा यांच्यात शिवसेना-भाजपने मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ वाटून घेण्याचे ठरले होते. तसं झालं असतं तर आज अडीच वर्षे झाली आहेत. जे काही घडलं ते सन्मानाने झाले असते. मग त्यावेळी नकार देऊन आता भाजपाने असं का केले?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
शिवसेना अधिकृतपणे तुमच्यासोबत होती. लोकसभा, विधानसभेत आम्ही एकत्र होतो. निवडणुकीच्या आधी हेच ठरले होते. मग मला कशाला मधे मुख्यमंत्री होण्यास भाग पाडलं. तसं घडलं असतं तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता. माझ्याशी अशा पद्धतीने वागले याचं दु:ख झाले आहे. माझ्या पाठीत सुरा खुपसला. मला दिलेला शब्द पाळला असता तर निदान अडीच वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री झाला असता. आता पाचही वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री नसणार आहे. यात भाजपाला आणि त्यांच्या मतदाराला काय आनंद आहे माहिती नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
माझा राग मुंबईवर काढू नका
माझ्यावर राग आहे ना तो माझ्यावर काढा. माझ्या पाठीत वार करा. पण मुंबईच्या काळजात कट्यार घसवू नका. माझा राग मुंबईवर काढू नका. आरेचा निर्णय त्यांनी बदलला त्याचं मला खरचं दुख होत आहे. ही कोणाचा खाजगी मालमत्ता नाही, तिथे कोण्या बिल्डरला आंदन देत नाही आहोत. तिथे पर्यावरणासाठी आवश्यक जंगल आणि वनराई होती ती एका रात्रीत.. रात्रीस खेळ चाले हे त्याच आता ब्रीद वाक्य आहे, एका रात्री झाडांची कत्तल झाली. असा टोला त्यांनी लगावला आहे.