लंडन – जागतिक टेनिसमध्येच नव्हे तर चारही ग्रॅण्डस्लॅण टेनिस स्पर्धेत सर्वात मानाची समजली जात असलेली विम्बल्डन टेनिस स्पर्धा आजपासून (सोमवार) सुरु होत आहे. यंदाच्या या स्पर्धेत सर्बियाचा जागतिक अग्रमानांकित नोवाक जोकोवीच, स्पेनचा अव्वल टेनिसपटू राफेल नदाल व अमेरिकेची 23 ग्रॅण्डस्लॅम विजेती सेरेना विल्यम्स यांच्या कारकिर्दीतील ही संघर्षाची स्पर्धा ठरण्याची शक्यता आहे. जोकोवीच व नदालमध्ये सामना रंगला तर स्पर्धेचा कळसाध्याय ठरणार आहे.
नदालने नुकतेच फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. जोकोवीच याला यंदाच्या मोसमात ही सर्वात मोठी स्पर्धा ठरेल कारण ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत त्याला व्हिसाच्या कागदपत्रात आलेल्या तांत्रिक कारणामुळे सहभागी होत आले नव्हते. तसेच या स्पर्धेनंतरही अमेरिकन ओपन स्पर्धेतही त्याचा सहभाग संकटात सापडला आहे.
त्यामुळे आता त्याला ही स्पर्धा जिंकत मोसमाची अखेर यशस्वी करण्यासाठी तो सज्ज आहे. नदाल लाल मातीच्या कोर्टचा दिग्गज खेळाडू असून तेच त्याने फ्रेंच टेनिस स्पर्धा जिंकताना आपले वर्चस्व सिद्द केले असून आता त्याला ग्रास कोर्टवरही आपली गुणवत्ता दाखवण्याची सुवर्ण संधी आहे.
सेरेनाच्या कामगिरीकडे लक्ष
या स्पर्धेत यंदा सर्वात मोठे आकर्षण आहे ते म्हणजे अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचा सहभाग. गेल्या काही मोसमांपासून सेरेनाला सातत्याने दुखापतीने ग्रासले होते. याच विपरीत काळातून ती बाहेर येत यंदाच्या स्पर्धेत थाटात पुनरागमन करण्यासाठी सज्ज बनली आहे. खरेतर 23 ग्रॅण्डस्लॅम विजेत्या या खेळाडूला यंदा मात्र, मानांकन देण्यात न आल्याने ती चक्क बिगरमानांकित खेळाडू म्हणून ती सहभागी होत आहे. या स्पर्धेत सेरेनाला मुख्य आव्हान राहणार आहे ते पोलंडच्या इगा स्वेटेकचे. स्वेटेक गेल्या काही स्पर्धांमधून सातत्याने सरस खेळ करत असून तीला ही सर्वात मानाची समजली जाणारी स्पर्धा जिंकण्याची संधी आहे.