38 वर्षांपासून पालखी सजवण्याची गरुड कुटुंबाने जपली परंपरा
आळंदी – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा परंपरेने चालत आला आहे. या सोहळ्यात माऊलींची पालखी सुगंधी करण्याचे काम येथील गरुड परिवार स्वखर्चाने गेल्या 38 वर्षांपासून अव्यहतपणे करीत आहे. दरम्यान, गेली दोन वर्षे करोनामुळे पायी पालखी सोहळा झाला नाही, यंत्रा मात्र तो होत असल्याने त्यांनी ही परंपरा जपली आहे. आळंदी ते पंढरपूर पुन्हा पंढरपूर ते आळंदी अशी सेवा गरुड कुटुंबाने जपली आहे.
माऊलींचे निस्सीम भक्त, आळंदी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, अखिल भाजी मंडई मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुष्प सजावटीचे मानकरी व संत भोजलिंग काका सेवा समितीचे अध्यक्ष कै.नानासाहेब भिकोबा गरुड यांचे दोन वर्षापूर्वी निधन झाले. नानासाहेब गरुड यांनी गेली 36 वर्षे माऊलींची पालखी आळंदी ते पंढरपूर व पुन्हा पंढरपूर ते आळंदी असा तब्बल 32 दिवसांचा पायी प्रवास करीत असताना नियमित पालखीची पुष्प सजावट ही स्वखर्चातून करीत होते.
दोन वर्षांनंतर यंदाचा पायीवारी पालखी सोहळा अतिशय उत्साही व हरिनाम गजरात पंढरीकडे रवाना होणार आहे. मंगळवारी (दि. 21) माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थित माऊली मंदिरात पार पडणार आहे. त्यासाठी गेली 36 वर्षांची पालखी सजावटीची परंपरा कै. नानासाहेब भिकोबा गरुड यांचे तीन पुत्र प्रदीप, सुदीप, व संदीप हे आपल्या वडिलांच्या पालखी सोहळ्यातील सेवेच्या मानाचा विडा यापुढे देखील कायम ठेवणार असल्याचे प्रदीप गरुड यांनी सांगितले. स्व.नानासाहेब गरुड फक्त आळंदी ते पंढरपूर पालखी सजावटीचे काम करीत नव्हते तर दरवर्षी लोणंद येथे वारकऱ्यांना त्यांच्या दिंडीच्या माध्यमातून पंगत घालत असत. तिही परंपरा यापुढे कायम त्यांची तीन मुले सुरू ठेवणार आहेत.
मध्यरात्रीनंतर पालखी सजावटीला प्रारंभ
माऊलींचे महाद्वार हे सोमवारी (दि. 20) मध्यरात्री उलटल्यानंतर विविध रंगी सुगंधी फुलांनी सजविण्याचे काम हाती घेणार आहे. महाद्वारास तोरण बांधून मंगळवारी (दि. 22) पहाटे तीन वाजता पालखी सजावटीचे काम आठ ते दहा कामगारांना मार्फत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच पालखी आजोळ घरातील आपला पहिला मुक्काम आटोपून पंढरीकडे मार्गस्थ होईल. त्या प्रत्येक मुक्कमाच्या ठिकाणी पालखीची नियमित पहाटे तीन ते पाच या वेळेत पालखी विविधरंगी फुलांनी सजविण्याचे काम करण्यात येईल असे सुदीप गरुड यांनी सांगितले. पालखी सजावटीची सुरुवात महाद्वाराला तोरण बांधले जाते माऊलींच्या पादुकांला हार घालून केली जाते.
या फुलांचा वापर
लिली, गुलाब, मोगरा, तुळस, जरबेरा, ओरकेट, डज गुलाब, शेवंती, निशीगंध, गुलछडी
मार्केट यार्डातून फुलांची दररोज खरेदी
माऊलींची पालखी नियमित रंगीबेरंगी व सुगंधी फुलांनी सजविण्यासाठी पुणे येथील मार्केट यार्डमधून दररोज फुलांची खरेदी करून पालखीचा मुक्काम ज्या ठिकाणी असेल तिथपर्यंत फुले पोहोचवली जातात. यासाठी 8 ते 10 कारागीर पुष्प सजावटीची काम पालखी पुढे मार्गस्थ होण्यापूर्वीच पूर्ण करतात त्यासाठी कारागिरांना त्यांच्या कामाचा मोबदला तसेच जेवणाची व्यवस्था गरुड परिवाराकडून केली जाते. यासाठी महिनाभर होणारा खर्च स्वतः गरुड परिवार आजवर करीत आला आहे. यापुढेही वडिलांची पालखी सजावटीची परंपरा कायम सुरू ठेवणार असल्याचे गरुड परिवारातील सदस्यांनी सांगितले.