मुंबई : आज राज्यात २४ वर्षांनंतर पुन्हा राज्यसभेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये मतदानाचा कोटा वाढवल्यामुळे नाराजी सुरु झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपाच्या अध:पतनाचा इशारा दिला आहे.
आज सर्वच पक्षांकडून आमदार विधानभवनात येऊन मतदान करत आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या मतांचा कोटा ४२ वरून ४४ केल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, शिवसेनेच्या नाराजीनंतर त्यांनी पुन्हा निर्णय बदलून तो ४२ केल्याचे देखील सांगण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
भाजपा ने अनिल बोंडे यांची अवस्था महाभारतातील शकुनी मामा सारखी करुन ठेवली आहे. तुम्ही फक्त आपल्या गटार वाणीतुन “भांजे” म्हणत फक्त पासे टाकत राहा कुरुक्षेत्रा वरील युद्ध श्रीकृष्ण जिंकुन देणार.#नरोवाकुंजरोवा
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 10, 2022
दरम्यान, या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यासाठी अमोल मिटकरी यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी,“महाविकास आघाडी सरकारमध्ये आज चारही जागेवर आमचे उमेदवार निवडून येतील. भाजपाकडून काही बातम्या पेरल्या जात आहेत की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वितुष्ट आहे. त्यात कोणतंही तथ्य नाही. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी नव्या जोमाने हे उमेदवार उभे केले आहेत. ते निवडून येतील”, असे मिटकरी जारी केलेल्या व्हिडीओ संदेशामध्ये म्हणाले आहेत.
दरम्यान, आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने चंद्रकांत पाटलांचे नाव घेत मिटकरींनी खोचक टोला लगावला आहे. “फटका बसण्याची शक्यता भाजपाला आहे. चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज फटका कुणाला बसणार? धनंजय महाडिक की अनिल बोंडे हे स्पष्ट होईल. भाजपाच्या अध:पतनाला आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानमित्त सुरुवात झाली असं मी समजतो”, असं मिटकरी म्हणाले.