42 वर्षीय एलिसन फ्लुक होती इसीसची महिला लष्करप्रमुख
वॉशिंग्टन : गेल्या काही वर्षांमध्ये इसीस या दहशतवादी संघटनेचा प्रभाव कमी झाला असला तरी या संघटनेमध्ये दीर्घकाळ कार्यरत असलेल्या एका महिला शिक्षिकेची मात्र सध्या चर्चा सुरू आहे. 42 वर्षे एलिसन फ्लूक ही महिला इसीस या संघटनेतील महिला लष्कर प्रमुख होती आणि तिच्याकडे दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याचे मुख्य काम होते. ती सध्या तुरुंगात असून तिला वीस वर्षाची शिक्षा झाली आहे.
इसीस संघटनेत कार्यरत असलेल्या महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम करणाऱ्या एलिसनला गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात शिक्षा देण्यात आली होती. या शिक्षेविरुद्ध तिने अपील केले असून त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या नातेवाईकांना भेटण्याचीही परवानगी देण्यात आलेली नाही, त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी सुद्धा या निर्णयाविरुद्ध न्यायालयात अपील केले आहे. मुळच्या अमेरिकेच्या असलेल्या एलिसनने इसीसमध्ये काम करण्यासाठी 2011 मध्ये अमेरिका सोडली होती आणि ती इराकमध्ये गेली होती. तेथून ती लिबिया आणि सीरियामध्ये गेली आणि तिथे तिने इसीस शी संबंधित महिलांना लष्करी प्रशिक्षण देण्यास प्रारंभ केला.
आपल्या कारकिर्दीमध्ये एलिसनने 5 लग्न केली होती. तिचा पहिला पती स्नायपर होता पण एका कारवाईत तो मरण पावल्यानंतर तिने आणखी एक लग्न केले. तिचे सर्वच पती इसिसशी संबंधित दहशतवादी होते एलिसन इसीसमध्ये अतिशय लोकप्रिय होती. तिला खतीबा नुसारबह या नावाने ओळखले जायचे याशिवाय मोहमद अल अमरिकी हे सुद्धा नाव देण्यात आले होते. आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीमध्ये एलिसनने 100 पेक्षा जास्त मुलींना आणि महिलांना दहशतवादाचे प्रशिक्षण दिले आहे.
एके फोर्टी सेवन रायफल कशी चालवायची आत्मघाती हल्ला कसा करायचा याबाबत विशेष प्रशिक्षण महिलांना दिले आहे. एलिसन फ्लूक अमेरिकेची असली तरी तिला अमेरिका आवडत नव्हती. अमेरिकेवर आणखीन एक मोठा हल्ला करण्याची तयारी तिने केली होती. अमेरिकेतील काही महत्त्वाची विद्यापीठे उडवण्याची योजना तिने आखली होती, पण ती प्रत्यक्षात येण्यापूर्वी ती हाती लागली तिच्यावर खटला चालवण्यात आला आणि तिला वीस वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.