गतवर्षी बारावीचा निकाल 99.86 टक्के इतका लागला होता. त्या तुलनेत यंदा 94.64 टक्के इतका निकाल लागला. म्हणजे यंदा 5.22 टक्क्याने निकाल घटला आहे. गतवर्षी 16 हजार 474 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 16 हजार 451 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. मुलांच्या निकालाचे प्रमाण 99.85 टक्के तर, मुलींच्या निकालाचे प्रमाण 99.87 टक्के इतके होते. यावर्षी मुलांच्या टक्केवारीचे प्रमाण 93.98 टक्के इतके राहिले. तर, टक्केवारीत सरशी घेत 95.42 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
पिंपरी (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल 94.64 टक्के इतका लागला आहे. त्यामध्ये मुलींनी बाजी मारली असून मुलांच्या तुलनेत 2.25 टक्क्याने आघाडी घेतली आहे. गतवर्षीच्या तुलनेत 5.22 टक्क्याने निकाल घटला आहे. बारावीच्या परीक्षा यंदा 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान घेण्यात आल्या. करोनानंतर यंदा प्रथमच ऑफलाइन पद्धतीने बारावीच्या परीक्षा झाल्या.
बुधवारी दुपारी एकनंतर विद्यार्थ्यांना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन निकाल पाहण्याची सुविधा देण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी मोबाइल, लॅपटॉप यांच्या माध्यमातून घरबसल्या निकाल पाहिला. तसेच, सायबर कॅफेमध्ये जाऊन देखील बऱ्याच जणांनी निकाल जाणून घेतला. निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडिया आणि दूरध्वनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला.
शहरातून यंदा बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 17 हजार 704 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 16 हजार 756 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. टक्केवारीत हे प्रमाण 94.64 टक्के इतके राहिले. परीक्षेस बसलेल्या 9 हजार 571 मुलांपैकी 8 हजार 995 मुले उत्तीर्ण झाली. तर, 8 हजार 133 मुलींपैकी 7 हजार 761 मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांच्या टक्केवारीचे प्रमाण 93.98 टक्के तर, मुलींच्या टक्केवारीचे प्रमाण 95.42 टक्के इतके राहिले आहे.
मावळ तालुक्यात मुलींची बाजी
वडगाव मावळ (प्रतिनिधी) – वडगाव मावळ येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर कॉलेजचा 12 वी चा निकाल 100 टक्के लागला आहे. या विद्यालयातील सुमारे 179 विद्यार्थी इयत्ता बारावीच्या परीक्षेस बसले होते. त्यातील सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये कला शाखेत प्रथम क्रमांक प्रगती पांडुरंग नब्रे (78.67), द्वितीय क्रमांक अश्विनी संजय चांदणे (73.17), तृतीय क्रमांक जागृती अशोक उदावंत (68.50). वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक सिद्धी माच्छिंद्र माने (85.67), द्वितीय साक्षी सुनील खांदवे (78.67), तृतीय प्रियांका बीबभू पाणी (72.17). विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक प्रवीण उमेश आगळमे (63.67), द्वितीय प्रितिका अनिल (63.00), तृतीय अंकिता अंकुश हेमाडे (61.67). संयुक्त शाखा प्रथम क्रमांक अवसरी तानाजी शिंदे (78.00), द्वितीय मानसी बाळू कालेकर (74.00), व सोनाली नागनाथ मिटकरे (74.17), तृतीय निकिता खंडू सातपुते (69.50).