रामकुमार आगरवाल
देहूगाव – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा आषाढी वारी 337 व्या पालखी सोहळ्यासाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका, पालखी, पालखीतील आभुषणे, अब्दागिरी, चोपदाराचे दंड, गरूड टक्के, समया आणि चांदीच्या रथाला चांदीचा मुलामा (चकाकी) देण्याचे काम बुधवारी (दि. 8) सकाळी प्रारंभ करण्यात आला. हे काम सायंकाळपर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती पिंपरी येथील घनश्याम गोल्डचे व्यवस्थापक कुशल वर्मा यांनी दिली आहे.
श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा 20 जूनला प्रस्थान ठेवणार आहे. 21 जून रोजी तीर्थक्षेत्र देहूहून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने सालाबाद प्रमाणे पालखी आणि रथाला चकाकी देण्यात येत आहे. सोहळ्यात असणारी आभुषणे, अब्दागिरी, चोपदाराचे दंड, गरूडटक्के, समया, तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मुख्य मंदिरातील महीरप, मेघडंबरी, शेषनाग, मखर, चौकट, दरवाजे, श्रीं ची चांदीची आभुषणे, पूजेचे थाळ, तांब्याची समई, चौरंग, पाट, अभिषेकाचे पात्र यांना चकाकी देण्याचे काम करण्यात येत आहे.
चकाकी देण्यासाठी लिंबाचा रस, चिंच मिश्रित पाणी, रिठा आणि काही रसायनांचा वापर करीत स्वयंचलित तांब्याच्या तारा असलेला ब्रश, तारेचा ब्रश, दोन यांत्रिकी ब्रश, कापड आदी साहित्याच्या वापराने चकाकी करण्यात येत आहे. यासाठी वर्मा यांच्या देखरेखीत सुनील दीक्षित, कमर अत्तार यासह दहा कर्मचारी सेवाभावाने चकाकी देण्याचे काम करत आहेत.
गत दोन वर्षे करोना महामारी संकटामुळे पालखी सोहळा पायी वारी झाली नाही. मोजक्याच वारकऱ्यांसह संत तुकोबांच्या पादुका बसमध्ये ठेवून पालखी रथ उभा होता. त्यामुळे यंदा खडकी येथील 512 वर्कशॉपमध्ये त्याची देखभाल डागडूजी व दुरुस्ती करण्यात आली आहे.
पालखी सोहळ्याठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती
पिंपरी (प्रतिनिधी) – श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना जिल्हा प्रशासन, महापालिका आणि दोन्ही संस्थांच्या वतीने जोरदार तयारी सुरू आहे. अशा परिस्थितीत सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी महापालिकेने तीन समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे 20 जून रोजी प्रस्थान होणार असून श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे 21 जून रोजी प्रस्थान होणार आहे. दोन्ही पालख्या शहरातून पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात. या पालखी सोहळ्याच्या नियोजनात कमतरता राहू नये, यासाठी महापालिकेने अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची मुख्य समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी विठ्ठल जोशी यांची तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज याच्या पालखी सोहळ्यासाठी सचिन ढोले यांची समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.