मेहसाणा – गुजरातला बदल हवायं. गुजरातमधील जनता भाजपला विटली आहे. भाजपवाले गुंडगिरी करतात, धमकावतात. आम आदमी पक्ष (आप) हे भाजपला बरे करणारे एकमेव औषध आहे, अशी भूमिका दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी मांडली.
गुजरातमध्ये चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीत सत्तारूढ भाजपपुढे आव्हान उभे करण्याचा निर्धार आपने केला आहे. गुजरातमधील सज्जतेसाठी परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून आपने जनसंपर्क अभियान हाती घेतले आहे. त्याचाच भाग म्हणून केजरीवाल यांचा येथे रोड शो झाला. त्यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली.
भाजपविरोधात बोलल्यास त्या पक्षाचे सदस्य गुंडगिरी करतात अशी माहिती यात्रेदरम्यान आपच्या नेत्यांना जनतेने दिली. हिंमत असेल तर आपला धमकावून दाखवा. पण, भाजप तसे करणार नाही. तो पक्ष आमच्या देशभक्तीला, प्रामाणिकपणाला घाबरतो, अशी खिल्ली केजरीवाल यांनी उडवली. कॉंग्रेसने गुजरातमधील मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला जोरदार टक्कर दिली होती. यावेळी कॉंग्रेसला मागे टाकून भाजपचा पर्याय बनण्याची आकांक्षा आप बाळगून आहे.