अमरावती – विदर्भातील 427 वर्षांची प्राचीन परंपरा असलेल्या श्री रुक्मिणी मातेच्या पालखीचे भव्य स्वागत अमरावतीतील बियाणी चौकात करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर, श्री राजराजेश्वर महाराज यांच्यासह अनेक मान्यवरांनी पालखीपूजन व वारकऱ्यांचे स्वागत केले. श्री रामचंद्र युवक कल्याण संस्थेच्या वतीने तीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.
श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या पायदळ दिंडी पालखीच्या दर्शनासाठी शेकडो अमरावतीकर उपस्थित होते. पालखीच्या स्वागतानिमित्त बियाणी चौकात व्यासपीठ उभारण्यात येऊन श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. त्यासभोवती फुलांच्या माळा, रांगोळ्या, स्वागतफलकांनी संपूर्ण चौक सुशोभित करण्यात आला होता.
सुमधूर अभंगवाणी सादर करणाऱ्या संगीत पथकासाठी स्वतंत्र व्यासपीठ उभारण्यात आले होते. अशा उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात पालखी चौकात येताच वारकरी व भाविकांनी “रुक्मिणीवल्लभ कृष्ण हरी’चा एकच जयघोष केला. यावेळी भक्तिमय अभंगवाणी व टाळमृदंगाच्या साथीने आसमंत निनादून गेले होते. कोविड साथीमुळे दोन वर्षाच्या निर्बंध संपल्यानंतर मुक्त वातावरणात पालखीचे अंबानगरीत आगमन झाल्यामुळे वारकरी बांधवांमध्ये उत्साह संचारला होता.