अहमदाबाद – एलिमिनेटर लढतीत लखनौ सुपर जायंट्सचा पराभव करत दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केलेल्या रॉयल चॅलेंजर बेंगळुरुला राजस्थान रॉयल्सशी दोन हात करायचे आहेत. या स्पर्धेत राजस्थानची वाटचाल स्वप्नवत झाली असली तरीही महत्वाच्या सामन्यांत भरात आलेल्या बेंगळुरुचे पारडे या सामन्यात जड राहणार असल्याचेच दिसत आहे.
राजस्थानचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू जोस बटलर असून त्याने या स्पर्धेत तब्बल ती शतके फटकावून 700 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. मात्र, त्यालाही नंतरच्या काही सामन्यांत अपयशाचा सामना करावा लागला आहे. त्याच्या कामगिरीत पहिल्या टप्प्यानंतर सातत्य राहिलेले नाही. तसेच त्यांचा कर्णधार संजू समसन थाटात सुरुवात करत असला तरीही त्याला मोठी खेळी करता आलेली नाही. या दोघांच्या व्यतिरिक्त त्यांच्या अन्य फलंदाजांनी साफ निराशा केली आहे.
गुजरातविरुद्धच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचे यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडीक्कल, शेमरन हेटमायर यांच्याकडेही सातत्याचा अभाव असल्याचे दिसून आले आहे. गोलंदाजीत यजुवेंद्र चहल, रवीचंद्रन अश्विन वगळता त्यांच्या गोलंदाजांनाही संमिश्र यश मिळाले आहे. ट्रेंन्ट बोल्ट जागतिक दर्जाचा गोलंदाज असला तरीही त्याला यंदा फारसे यश मिळालेले नाही.
दुसरीकडे बेंगळुरूचा संघ पराभवांतून खूप काही शिकून सरस कामगिरी करत आहे. त्यांचा कर्णधार फाफ डुप्लेसी सातत्य राखू शकत नसला तरीही विराट कोहली भरात आल्याने त्यांला दिलासा मिळाला आहे. त्यातच दिनेश कार्तिकने सातत्याने सरस कामगिरी केली असल्याने त्यांच्या फलंदाजीला आठव्या क्रमांकापर्यंत बळकटी मिळाली आहे. लखनौविरुद्धच्या लढतीत रजत पाटीदारने फटकावलेले शतक त्यांच्यासाठी अंतिम फेरी गाठण्याची आशा दाखवणारे ठरले आहे. तसेच द्विशतकी धावांचा डोंगर उभारल्यावर लखनौ विजयाकडे कूच करत असतानाच त्यांच्या गोलंदाजांनी महत्त्वाच्या क्षणी सरस कामगिरी केल्यामुळे त्यांना या सामन्यात प्रवेश करणे सोपे ठरले. त्यांचा ग्लेन मॅक्सवेल हा हुकुमी एक्का काही सामन्यात अपयशी ठरला असला तरीही तो कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र पालटू शकतो. त्याला रोखण्यासाठी राजस्थानच्या गोलंदाजांना प्रचंड मेहनत करावी लागणार आहे.
गोलंदाजीबाबत बोलायचे झाले तर राजस्थानपेक्षाही जास्त सरस गोलंदाजी बेंगळुरुकडे आहे. जोश हेझलवूड व वनिंदू हसरंगा सातत्याने बळी मिळवत असल्याने राजस्थानच्या फलंदाजांवर दडपण येणार आहे. त्यातच हर्षल पटेल व महमद सिराज धावाही रोखत असल्याने बेंगळुरूला केवळ बटलर व सॅमसन यांच्यावरच लक्ष केंद्रित करता येणार आहे. या सामन्यातील विजेता संघ येत्या रविवारी गुजरात टायटन्सशी अंतिम फेरीत खेळणार आहे. आजवर बेंगळुरुला या स्पर्धेचे एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. त्यामुळे ही यंदा मिळालेली संधी ते सोडणार नाहीत असेच चित्र दिसत आहे, त्यामुळे त्यांचेच पारडे या सामन्यात वरचढ राहणार आहे.
बटलरला रोखावे लागणार
राजस्थानचा जोस बटलर यंदाच्या स्पर्धेत तुफानी फॉर्ममध्ये आहे. त्याने अनेक सामन्यांत समोरच्या संघाच्या हातातून विजय हिरावून घेतला आहे. त्याला बाद करण्यासाठी बेंगळुरूच्या गोलंदाजांना काही योजनाही आखाव्या लागणार आहेत. त्याच्या फलंदाजीची शैली व त्याचे आतापर्यंतच्या बाद होण्याची पद्धत पाहिली तर त्याला जास्तीत जास्त ऑफसाईडला खेळवणे बेंगळुरुच्या हिताचे ठरणार आहे. तो लेगसाईडला अत्यंत आक्रमक फलंदाजी करतो, त्याची ही रसद तोडली तर तो आततायी फटका मारून बाद होतो त्यामुळे बेंगळुरूच्या गोलंदाजांना आखलेल्या योजनेनुसार गोलंदाजी करावी लागणार आहे.