इस्लामाबाद – पाकिस्तानी तालिबान या कट्टर दहशतवादी गटाने पाकिस्तानच्या सैन्याबरोबर 30 मे पर्यंत युद्धबंदी जाहीर केली आहे. अफगाणिस्तानातील वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पाकिस्तानी तालिबानने या युद्धबंदीचा निर्णय जाहीर केला आहे. माजी आयएसआय प्रमुख आणि सध्याचे पेशावर कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांच्याबरोबर झालेल्या बैठकीदरम्यान तेहरीक ए तालिबान पाकिस्तान या गटाने 30 मे पर्यंत युद्धबंदीचा निर्णय मान्य केला आहे. आदिवासींमधील वरिष्ठांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे, असे “टीटीपी’ चा प्रवक्ता मुहम्मद खुरसानी याने सांगितले.
“टीटीपी’बरोबरच्या चर्चेमध्ये पाकिस्तानी लष्करी गुप्तहेर विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर “इंटर सर्व्हिसेस इंटिलीजन्स’चे अधिकारीही सहभागी झाले होते. अफगाणिस्तानच्या सीमाभागातल्या आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभुमीवर पाकिस्तानी तालिबान संघटनेने मेहसूद आणि मलाकांद या आदिवासींच्या नेत्यांबरोबरही चर्चा केली होती. कट्टरवादी हक्कानी नेटवर्कने दिलेल्या हमीच्या आधारे जनरल हमिद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने “टीटीपी’च्या वरिष्ठ म्होरक्यांबरोबर ही चर्चा केल्याचे समजते आहे.
दहशतवादी कारवाया, दहशतवादाला अर्थसहाय्य आदी आरोपांखाली जन्मठेप आणि फाशीची शिक्षा सुनावलेल्या वरिष्ठ कमांडरच्या सुटकेची मागणी “टीटीपी’ कडऊन केली जात आहे. तर तालिबानने उत्तर आणि दक्षिण वझिरीस्तानच्या आदिवासी जिल्ह्यांतील पाकिस्तानी लष्करी कारवाया आणि शोधमोहीम बंद करण्याची मागणी केली आहे.