मॉस्को – रशियाचे अध्यक्ष अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्यावर एक शस्त्रक्रिया केली गेल्याची माहिती पुढे आली आहे. ब्रिटीश गुप्तहेर विभागाचा माजी अधिकारी आणि रशियातील प्रभावशाली राजघराण्यातील व्यक्तीने अलिकडेच पुतीन हे गंभीर आजारी असल्याचे म्हटले होते. त्यातच आता ही नवीन माहिती पुढे आली आहे.
पुतीन यांच्या पोटामध्ये पाणी झाले होते. ते काढण्यासाठी ही शस्त्रक्रिया केली गेल्याची माहिती मिळते आहे. गुरुवारी रात्री ही शस्त्रक्रिया केली गेल्याचे एका टेलिग्राम चॅनेलवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. पण ही शस्त्रक्रिया कर्करोगाशी संबंधित नव्हती.
पुतीन हे एका ऑन्कोलॉजिस्टकडे नियमित उपचार घेत आहेत. त्यांच्यावर थायरॉईडच्या कर्करोगाचे उपचार सुरू आहेत, असे रशियातील “द प्रोदेक्ट’नावाच्या शोधपत्रकारिता करणाऱ्या पत्रिकेने एप्रिलमध्येच म्हटले होते. तर पुतीन यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचे रशियातीलच राजघराण्यातील एका प्रसिद्ध व्यक्तीने अलिकडेच म्हटले होते.
रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासूनच पुतीन यांच्या आजारपणाच्या वेगवेगळ्या बातम्या फिरायला लागल्या आहेत. पुतीन यांच्यावरील संभाव्य शस्त्रक्रियेमुळे रशियाचा कारभार तात्पुरता कट्टरवादी सुरक्षा परिषदेच्या प्रमुखांकडे सोपवला जाणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येऊ लागली होती.