मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज नवोदित फलंदाज तिलक वर्मा याने चक्क विक्रमादित्य सुनील गावसकर यांना प्रभावित केले आहे. येत्या काळात तिलक वर्मा भारतीय संघाकडून खेळताना दिसेल, असा विश्वास गावसकर यांनी व्यक्त केला आहे. गावसकर यांच्याही आधी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने तिलकबाबत हेच विधान केले होते, त्यालाही गावसकर यांनी समर्थन दिले आहे.
तिलक वर्मा याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना यंदाच्या मोसमात 12 सामन्यांतून 368 धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्सची कामगिरी यंदा अत्यंत सुमार झाली असली व त्यांना पहिल्यांदाच प्लेऑफही गाठता आले नसले तरीही त्यात तिलकच्या कामगिरीने त्यांना दिलासा मिळाला आहे. त्याची कामगिरी व सातत्य पाहता येत्या काळात तो भारतीय संघाचा मधल्या फळीतील आश्वासक खेळाडू म्हणून नावारूपाला येईल, असेही गावसकर यांनी म्हटले आहे.
तिलक वर्माचे टेम्प्रामेंट चांगले आहे. त्याने या स्पर्धेत खेळलेल्या प्रत्येक डावात आपली खेळी विचारपूर्वक व अभ्यासपूर्णरीत्या खेळली आहे. समोरची परिस्थिती कितीही बिकट असली तरीही त्याने नैसर्गिक खेळ करत संघाला सावरण्याचा वारंवार प्रयत्न केला आहे. दडपण कसे हाताळायचे हे तो खूप लवकर शिकल्याचे त्याच्या जबाबदारी फलंदाजीतून दिसून येते. त्याच्या फलंदाजीत पुस्तकी फटक्यांसह सर्व मैदानभर फटके आहेत. इनोव्हेशन फटकेही तो लीलया फटकावताना दिसला आहे.
मोठ्या फटक्यांबरोबरच त्याचे एकेरी आणि दुहेरी धावा काढण्याचे कौशल्यही कौतुकास्पद आहे, त्यामुळेच तो एक परिपूर्ण फलंदाज वाटतो, आता त्याला जर देशाकडून खेळण्याची संधी मिळाली तर तो त्याचे सोने करेल, असा विश्वासही गावसकर यांनी व्यक्त केला आहे.
तंदुरुस्तीवर लक्ष हवे
येत्या काळात तिलक क्रिकेटच्या तीनही प्रकारात आपले वर्चस्व सिद्ध करेल इतकी क्षमता त्याच्याकडे निश्चितच आहे. मात्र, त्याचबरोबर त्याला आपल्या तंदुरुस्तीबाबत सजग राहावे लागणार आहे. याच एका बाबतीत त्याला जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे, असेही गावसकर म्हणाले.