ठाणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. कळवा पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. अॅडव्होकेट नितीन भावे नावाच्या व्यक्तीने शरद पवार यांना उद्देशून पोस्ट लिहिली आहे. केतकी चितळे हिने तिच्या फेसबुक आकाऊंटवर ही आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली.
दरम्यान अटक केल्यानंतर मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्याबाहेर केतकी हिच्यावर शाईफेक करण्यात आली. काही महिलांनी शाईफेक करून ‘केतकी हाय हाय’ अशा घोषणा दिल्या.
केतकीविरोधात ठाणे, पुणे आणि सातारा या तीन ठिकाणच्या तीन पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आली आहे. ठाणे पोलिसांच्या पथकाने केतकीला कळंबोली येथून ताब्यात घेतले. केतकीचा जबाब नोंदवून घेण्याची प्रक्रिया कळंबोली पोलीस ठाण्यात पार पडली. पोलिसांसोबत पोलीस ठाण्याबाहेर आलेल्या केतकी चितळेवर महिलांनी घोषणा देत शाईफेक केली.
दरम्यान राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या महिलांनी केतकी चितळेवर शाईफेक केल्याचे सांगितले. आमच्या पक्षाच्या अध्यक्षांविषयी कोणी चुकीच्या शब्दात बोलणार असेल तर त्याला घरात घुसून धडा शिकवू असे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या महिलांनी सांगितले.