श्रीनगर – कटराहून जम्मूला जाणाऱ्या बसला स्फोटानंतर आग लागल्याने शुक्रवारी जम्मूमध्ये मोठी दुर्घटना घडली. हा अपघात झाला त्यावेळी बसमध्ये 24 प्रवासी होते, त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आगीमुळे 22 प्रवासी भाजले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातातील जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. बसला आग कशी लागली याची नेमकी माहिती अद्याप समजू शकलेली नाही. घटनेच्या कारणाचा शोध घेण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी कटराहून जम्मूकडे जाणाऱ्या लोकल बसला आग लागली. प्रवाशांनी सांगितले की बस कटरापासून 1.5 किमी अंतरावर असलेल्या खरमलजवळ पोहोचली होती, तेव्हा बसमध्ये स्फोटाचा आवाज आला.
बसच्या इंजिनमध्ये हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, त्यानंतर संपूर्ण बसने पेट घेतला. संपूर्ण बसमध्ये आग इतकी वेगाने पसरली की प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.