मोरगाव : अष्टविनायक प्रथम तीर्थक्षेत्र मोरगाव (ता. बारामती) येथे आज अक्षय तृतीया निमित्ताने मयुरेश्वरास पन्नास डझन अंब्यांची आरास केली होती. श्रींचा आंब्यांनी सजवलेला गाभारा पाहण्यासाठी गणेश भक्त व परीसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
अक्षय तृतीया हा साडेतीन मुहर्तापैकी एक समजला जातो . यामुळे आज पुणे जिल्ह्यासह राज्यभरातील भाविकांनी गर्दी केली होती. आज पहाटे पाच वाजता गुरव मंडळीची प्रक्षाळ पूजा झाली. दिवसभर भाविकांची मंदीयाळी सुरु होती. आज अक्षय तृतीया निमित्ताने श्रींना आंब्यांची आराससाठी पेठेतील व्यापारी, गुरव पुजारी, गणेश भक्त यांनी पन्नास डझन आंबे दिले होते.
दुपारी तीन वाजता गौरव गाडे, ओम धारक, अथर्व धारक , प्रथमेश गाडे , श्रेयश धारक , आठवडेकरी पुजारी महेश गाडे यांनी मयुरेश्वर व सिध्दी बुद्धीस पोशाख चढविला. यानंतर आंब्यांची आरास केली .
गावातील व्यापारी , तरुण मंडळ , गुरव पुजारी , गणेश भक्त यांनी या सजावटीसाठी पन्नास डझन आंबे दिले होते. सुमारे तीन तास पूजा व आंब्यांची आरस सुरु होती . या सजावटीचा फोटो सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल होत असल्याने परीसरातील ग्रामस्थांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती .